PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर नतमस्तक; डॉ. आंबेडकर यांच्या शिकवणीनुसार देशाला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प
esakal March 31, 2025 05:45 PM

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला अभिवादन केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बुद्धवंदना दिली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई उपस्थित होते. पंतप्रधानांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असलेल्या परिसरात एक परिक्रमा केली.

सन २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा दीक्षाभूमीवर आले होते. त्यावेळी ते सुमारे अर्धा तास थांबले होते. तेव्हा त्यांनी ध्यानसाधना केली होती. आज नरेंद्र मोदी पवित्र दीक्षाभूमीवर पंधरा मिनिटे थांबले. मागील भेटीप्रमाणे ते याही वेळी ध्यानसाधना करतील हे गृहित धरून स्मारक समितीच्यावतीने आवश्यक तयारी करण्यात आली होती.

परंतु, यावेळी व्यस्ततेमुळे नरेंद्र मोदी यांनी ध्यानसाधना केली नसल्याचे समिती सदस्यांनी सांगितले. दरम्यान, स्मारक समितीतर्फे पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छासह दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेले स्मृतीचिन्ह देऊन देण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, ॲड. आनंद फुलझेले, सदस्य डॉ.राजेंद्र गवई, एन.आर.सुटे, विलास गजघाटे यावेळी उपस्थित होते.

पुष्पवर्षावाने स्वागत

दीक्षाभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. चारही बाजूंनी रस्ते बंद करण्यात आले होते, असे असतानाही चौकांमध्ये नागरिक पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गोळा झाले होते. पंतप्रधानांचा ताफा येताच नागरिकांनी पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनीही नागरिकांना हात दाखवून त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थातील एक नागपुरातील दीक्षाभूमी येथे येण्याचे सौभाग्य मिळाल्याने मी भारावून गेलो आहे. बाबासाहेबांची सामाजिक समरसता, समता आणि न्यायाची तत्त्वे या पवित्र स्थानाच्या वातावरणात सहज अनुभवता येतात. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंना समान हक्क आणि न्यायाची तरतूद करून पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते. मला खात्री आहे की, या अमृत कालखंडात आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणी आणि मूल्यांचे पालन करत देशाला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाऊ. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारताची निर्मिती हीच बाबासाहेबांना आपली खरी आदरांजली असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पवित्र दीक्षाभूमीला दुसरी भेट आहे. पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट देऊन एक चांगला संदेश देशाला दिला आहे. आपल्या विचारांसोबतच इतर विचारांचा आदर करण्याचा, संविधानाने वागण्याचा संदेश त्यांनी दीक्षाभूमी भेटीतून दिला आहे.

- डॉ. राजेंद्र गवई, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती

नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी पवित्र दीक्षाभूमीला दुसऱ्यांदा भेट दिली आहे. त्यांना येथे येऊन एक वेगळीच अनुभूती येते. नागपूर हे दीक्षाभूमी आणि संघभूमीचे शहर आहे. दोन्हींची विचारधारा वेगवेगळी आहे. परंतु त्यानंतरही दोन्ही विचारांचे लोक मोठ्या गुण्यागोविंदाने नांदतात. त्यामुळेच नागपूर भूमीचा बंधुभावाचा संदेश संपूर्ण देशात जातो. पंतप्रधानांच्या येण्याने आम्हाला प्रचंड आनंद झाला असून स्मारक समितीतर्फे त्यांचे अभिनंदन केले.

- विलास गजघाटे, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.