बेलापूर ते घोट कॅम्पदरम्यान एनएमएमटी बससेवा
esakal March 31, 2025 10:45 PM

खारघर, ता. ३१ (बातमीदार) : बेलापूर रेल्वेस्थानक ते घोट कॅम्पदरम्यान १ एप्रिलपासून एनएमएमटी बससेवा सुरू होणार असल्यामुळे परिसरातील प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
तळोजा परिसरातील घोट कॅम्प, अरिहंत सोसायटी, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून, नागरिकांना ये-जा करण्यासाठी रिक्षाशिवाय पर्याय नाही. रिक्षाचालकांकडून आकारले जाणारे भाडे जास्त असल्यामुळे एनएमएमटी परिवहन विभागाकडून तळोजा फेज दोन आरटीओ वाहनतळापर्यंत सुरू असेलेली ५२ क्रमांकाची बससेवा घोट कॅम्प, अरिहंत सोसायटीपर्यंत सुरू करावी, अशा प्रकारची तक्रार तळोजा वसाहतीमधील आदर्श सामाजिक संस्थेने लोकआयुक्ताकडे केली होती; तर काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश गायकवाड हे २०२१ पासून परिवहन सेवेकडे पत्रव्यवहार करीत होते. दरम्यान, घोट कॅम्पपर्यंत बससेवेसंदर्भात लोकआयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची सुनावणी २८ एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. लोकआयुक्त कार्यालयाकडून सुनावणीसंदर्भात सिडकोचे व्यस्थापकीय संचालक, पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि एनएमएमटीचे व्यस्थापक आदी अधिकाऱ्यांना पत्रे पाठविण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन सुनावणीपूर्वी नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेकडून १ एप्रिलपासून घोट कॅम्पपर्यंत बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत. घोट कॅम्पवरून सकाळी ५.५५ वाजता पहिली बस सुटणार आहे; तर बेलापूर रेल्वेस्थानकावरून शेवटची बस रात्री १० वाजता असणार आहे. प्रत्येक २५ मिनिटांनी बस उपलब्ध असणार असल्याचे एनएमएमटी प्रशासनाने सांगितले.
----------------
तळोजा वसाहतीमधून घोट कॅम्प परिसरात ये-जा करण्यासाठी बससेवा नसल्यामुळे नागरिकांना रिक्षा अथवा खासगी वाहनांनी जावे लागत असे. या भागात एनएमएमटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी परिवहन सेवेकडे केली होती. १ एप्रिलपासून बस सुरू होत असल्यामुळे समाधान वाटत आहे.
- अंकुश गायकवाड, पदाधिकारी, काँग्रेस तळोजा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.