आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा दारूण पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कोलकाता नाईट रायडर्स फलंदाजी आल्यानंतर पहिल्या षटकापासून धक्के बसले. कोलकाता नाईट रायडर्स संघ पूर्ण 20 षटकही खेळू शकला नाही. कोलकात्याने 16.2 षटकात सर्व गडी गमवून 116 धावा केल्या आणि विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 12.5 षटकात हे आव्हान गाठलं. कोलकात्याकडून अंगकृष रघुवंशीने सर्वाधी 26 धावा केल्या. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. क्विंटन डी कॉक 1, सुनील नरीन 0, अजिंक्य रहाणे 11, वेंकटेश अय्यर 3, रिंकु सिंह 17, मनिष पांडे 19, आंद्रे रसेल 5, हार्दिक राणा 4 धावा करून बाद झाले. तर रमणदीप सिंगने शेवटी काही फटकेबाजी करत 12 चेंडूत 22 धावा केल्या. या पराभवानंतर कोलकात्याची गुणतालिकेत मोठी घसरण झाली आहे. थेट सहाव्या स्थानावरून शेवटच्या स्थानी गच्छंती झाली आहे.
कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘सामूहिक फलंदाजीचं अपयश आहे. मी टॉसमध्ये सांगितल्याप्रमाणे फलंदाजीसाठी हा एक चांगली खेळपट्टी होती. या विकेटवर 180-190 धावा चांगल्या असत्या. खूप चांगला बाउन्स होता. कधीकधी तुम्हाला वेग आणि बाउन्सचा वापर करावा लागतो. या सामन्यातून आम्हाला खूप लवकर शिकायला मिळाले. गोलंदाजीत फार काही करू शकलो नाही. त्यांनी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न केले. पण बोर्डवर जास्त धावा झाल्या नाहीत. आम्ही विकेट गमावत राहिलो. पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावल्या. अशा परिस्थितीत चांगली धावसंख्या गाठणे कठीण होते. तुम्हाला ती भागीदारी चालू ठेवण्याची आवश्यकता आहे. शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी तुम्हाला एका फलंदाजाची आवश्यकता आहे.’
कोलकाता नाईट रायडर्सचा पुढचा सामना 3 एप्रिलला सनरायडर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना ईडन गार्डनवर होणार आहे. कोलकात्याचं हे होम ग्राउंड आहे. पण खेळपट्टीमुळे हे होम ग्राउंड म्हणावं की नाही असा वादही रंगला आहे. कोलकाता तीन पैकी 2 सामन्यात पराभव झाला आहे. अशीच स्थिती हैदराबादची आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात काय होते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.