IPL 2025 Points Table: मुंबई इंडियन्सने विजय मिळवताच गुणतालिकेत उलथापालथ, केकेआरचं मोठं नुकसान
GH News April 01, 2025 02:06 AM

आयपीएल 2025 स्पर्धेत अखेर मुंबई इंडियन्स विजयाचा नारळ फोडला आहे. सलग दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने विजयी ट्रॅकवर गाडी आणली आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्स कमबॅकसाठी आतुर होती. तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयाचे सूर सापडले आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून कोलकाता नाईट रायडर्सला बॅकफूटवर ढकललं. कमबॅकची संधीच दिली नाही आणि टप्प्याटप्प्याने विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सकडून अश्वनी कुमारने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 3 षटकात 24 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. तर दीपक चाहरने 2 विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, विग्नेश पुथूर आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी 116 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबईने 8 विकेट आणि 43 चेंडू राखून पूर्ण केलं. इतक्या मोठ्या विजयानंतर मुंबई इंडियन्सला नेट रनरेट सुधारण्यास मदत झाली आहे. शेवटच्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. मागच्या दोन सामन्यातील पराभवामुळे शून्य गुण आणि नेट रनरेट हा -1.163 इतका होता. तर कोलकाता नाईट रायझर्स या सामन्यापूर्वी सहाव्या स्थानावर होती. 2 गुण आणि -0.308 नेट रनरेट होता. पण मुंबईने पराभूत केल्यानंतर गुणतालिकेत ही दोन स्थान बदलली आहे.

मुंबई इंडियन्सने या विजयासह कोलकात्याच्या जागी म्हणजेच सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सचे 2 गुण झाले असून नेट रनरेट हा +0.309 आहे. कोलकात्याला मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने नेट रनरेटमध्ये मोठं नुकसान झालं आहे. थेट शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे. कोलकाता 2 गुण आणि -1.428 नेट रनरेटसह शेवटच्या स्थानी आहे.

आरसीबी 4 गुण आणि +2.266 नेट रनरेटसह पहिल्या स्थानी, दिल्ली कॅपिटल्स 4 गुण आणि +1.320 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी, लखनौ सुपर जायंट्स 2 आणि +0.963 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी, गुजरात टायटन्स 2 गुण आणि +0.625 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी, पंजाब किंग्स 2 गुण आणि +0.550 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी, मुंबई इंडियन्स 2 गुण आणि +0.309 नेट रनरेटसह सहाव्या, चेन्नई सुपर किंग्स 2 गुण आणि -0.771 नेट रनरेटसह सातव्या स्थानी, सनरायझर्स हैदराबाद 2 गुणा आणि -0.871 नेट रनरेटसह आठव्या स्थानी, राजस्थान रॉयल्स 2 गुण आणि -1.112 नेट रनरेटसह नवव्या स्थानी, तर कोलकाता नाईट रायडर्स 2 गुण आणि -1.428 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.