Raj Thackeray Latest News | गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नद्यांच्या प्रदुषणावर हल्लाबोल केला. गंगेमध्ये अर्धवट जाळलेली प्रेतं टाकली जातात. गंगेचं पाणी हे पिण्यासाठी नाही तर अंघोळीसाठीही योग्य नाही असं राज ठाकरे म्हणाले. त्यापूर्वी कुंभमेळ्यातून आणलेलं पाणी पिणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
नद्यांच्या दुर्लिक्षित मुद्द्यावरुन राज ठाकरेंच्या वक्तव्याला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दुजोरा दिला आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना, 'राज ठाकरे बोलत आहेत ते योग्य आहेत. त्यांच्या नदी प्रदुषणासंदर्भातील मताशी मी सुद्दा सहमत असल्याचे भुजबळ म्हणाले'.
यावेळी भुजबळांनी मागील कुंभमेळाचा दाखला दिला. भुजबळ म्हणाले, दहा-अकरा वर्षापूर्वी नाशिकमध्ये कुंभमेळा होता. त्यावेळेला श्री श्री रविशंकर आले होते. कुंभमेळ्याच्या आधी त्यांचा मोठा कार्यक्रम नाशिकमध्ये झाला होता. त्यावेळी त्यांनी इथलं पाणी इतकं खराब आहे की मी अंघोळ तर सोडा बोट सुद्धा बुडवणार नाही. असं श्री श्री रविशंकर म्हणाले होते असे भुजबळांनी सांगितले.
त्यानंतर मी विधानसभेत व विधानसभेच्या बाहेर अनेकवेळा हा मुद्दा उपस्थित केला. बाकी काही करा किंवा नका करु पण गोदावरीचं पाणी स्वच्छ करा असं आपण सांगितल्याचं भुजबळ म्हणाले. स्टार्म वॉटर ड्रेनेज मध्येच संडासचे पाईप जोडले आहेत. सकाळ संध्याकाळ बदा बदा ती सगळी घाण तेथून पडते.
भाविक मोठ्या श्रद्देने ते पाणी घरी घेऊन जात होते. नंतर आम्ही मग त्यावर एक मार्ग काढला. त्याच्या शेजारी एक दगडी गोमूक बनवून तेथे नळाचं पाणी सोडलं व ते पाणी लोकांना घेऊन जायला सांगितलं असं भुजबळ यांनी सांगितलं.
भुजबळ पुढे म्हणाले आपण सगळे देव मानतो. रामकुंडावर अस्थी विसर्जन केलं जातं. ते करताना आपल्याला पाणी शुद्ध ठेवायला पाहीजे. मात्र, खुशाल संडासचे पाणी त्याच्यामध्ये सोडतात. तुमची भक्ती, भावना या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही संडासचे पाणी त्यात सोडावं व त्यात अंघोळ करावी. त्यामुळे राज ठाकरे बोलत आहेत त्यांच्या त्या मताशी मी सुद्धा सहमत असल्याचं भुजबळ म्हणाले.