इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १६ वा सामना शुक्रवारी (३ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी रिषभ पंत कर्णधार असलेल्या लखनौ सुपर जायंट्सला दिलासा मिळाला आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटन्सविरुद्ध शेवटच्या क्षणी पराभवाचा धक्का बसला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा धक्का दिला.
मात्र, पुन्हा लखनौला तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध दारुण पराभवाला समोरे जावे लागले आहे. त्यामुळे लखनौ संघाला कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवत आहे.त्यातच त्यांचे अनेक वेगवान गोलंदाज दुखापतीने त्रस्त आहेत.
मोहसिन खान आधीच स्पर्धेतून बाहेर झाला असून त्याच्या जागेवर शार्दुल ठाकूरला संधी मिळाली आहे. याशिवाय आवेश खानही नुकताच दुखापतीतून परतला आहे. मयंक यादव अद्याप दुखापतीमुळे उपलब्ध नाही. पण आता आकाश दीपचे संघात आगमन झाल्याने लखनौच्या गोलंदाजीला आणखी बळ मिळाले आहे.
आकाश दीपला भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पाठीची दुखापत झाली होती. तो डिसेंबर २०२४ नंतर त्यामुळे क्रिकेट खेळला नव्हता. पण आता तो पूर्ण तंदुरुस्त असून बुधवारी (२ एप्रिल) लखनौ संघात दाखल झाला आहे. त्याला लखनौने ८ कोटी रुपयांना आयपीएल २०२५ लिलावात खरेदी केले होते.
आकाश दीपने याआधी २०२२ ते २०२४ दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये ८ सामने खेळले, ज्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या आहेत. आकाश दीपने गेल्याच वर्षी भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण केले होते.
त्याने शमीच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहची साथ दिली होती. तो ७ कसोटी सामने खेळले असून १५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीत ४२ टी२० सामने खेळले असून ४९ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, आता आकाश दीप शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे. तो आवेश खान आणि शार्दुल ठाकूरसह गोलंदाजीची जबाबदारी घेताना दिसू शकतो.
मुंबई इंडियन्सला बाहेरच्या मैदानात अपयशमुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यांना पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने आणि दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने पराभूत केले होते. हे दोन्ही सामने मुंबईने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या घरच्या मैदानात खेळले होते.
पण त्यानंतर आपल्या घरच्या मैदानात तिसरा सामना खेळताना मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत पहिला विजय नोंदवला होता. आता मुंबईला लखनौमध्ये चौथा सामना खेळायचा आहे. त्यामुळे आता बाहेरच्या मैदानातील मुंबईची कामगिरी सुधारणार का, हे पाहावे लागेल.