IPL 2025: ४, ६,४, ४.... वेंकटेश अय्यरचा वादळी खेळ, तर रिंकू सिंग-रघुवंशीचीही फटकेबाजी! KKR चे SRH समोर मोठं लक्ष्य
esakal April 04, 2025 07:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी (३ एप्रिल) १५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जात आहे. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्स संघात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात कोलकाताने हैदराबादसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सुरुवातीला हैदराबादच्या गोलंदाजांनी योग्यही ठरवले होते. कोलकाताकडून क्वींटन डी कॉक आणि सुनील नरेन यांनी सलामीला फलंदाजी केली.

पण डी कॉकला दुसऱ्याच षटकात कमिन्सने झीशन अन्सारीच्या हातून १ धावेवर बाद केले. त्यापाठोपाठ पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने सुनील नरेनचा अडथळा दूर केला. त्याने त्याला यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेनच्या हातून ७ धावांवर झेलबाद केले.

पण नंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी डाव सावरला. रहाणे सयंमी खेळत होता, तर रघुवंशीने आक्रमण केले. त्यामुळे त्यांच्यात ८१ धावांची मोठी भागीदारीही झाली. अखेर ही भागीदारी धोकादायक ठरत असतानाच रहाणेला झीशन अन्सारीने बाद केले.

क्लासेनने त्याचा झेल घेतलाय २७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३८ धावांची खेळी केली. नंतर रघुवंशीने अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला अर्धशतकानंतर कामिंडू मेंडिसने बाद केले. त्याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली.

शेवटी आणि रिंकु सिंग यांनी वादळी खेळ केला आणि संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला. वेंकटेशने १९ व्या षटकात पॅट कमिन्सविरुद्ध ४, ६,४,४, २,१ अशा धावा चोपल्या. यासह त्याने अर्धशतकही पूर्ण केले होते.

२० व्या षटकाची सुरुवातही वेंकटेशने षटकार आणि चौकाराने सुरुवात केली होती. पण तिसऱ्या चेंडूवर त्याला हर्षल पटेलने बाद केले. त्याने २९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावांची खेळी केली.

अखेरच्या चेंडूवर आंद्र रसेल धावबाद झाला. रिंकु सिंग १७ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३२ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे कोलकाताने २० षटकात ६ बाद २०० धावा केल्या.

सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, झीशन अन्सारी, हर्षल पटेल आणि कामिंडू मेंडिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.