PF चे पैसे काढण्यासाठी चेकचा फोटो अपलोड करण्याची चिंता दूर, ईपीएफओनं नियम बदलला
Marathi April 05, 2025 12:24 AM

ईपीएफओ नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं पीएफ खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील नियमात बदल केला आहे.पीएफ खात्यातून विविध कारणांसाठी पैसे काढता येतात. यामध्ये घर खरेदी, लग्न, आजारपण आणि इतर कारणांसाठी पैसे काढता येतात. मात्र, यासाठी यूएएन पोर्टलवरुन ऑनलाईन क्लेम करावा लागतो. क्लेम सादर करताना म्हणजेच फॉर्म नंबर 31 भरताना यापूर्वी बँक खात्याचा तपशील, खातेदाराचं नाव असणारा चेकचा फोटो अपलोड करावा लागत असे. मात्र, ईपीएफओनं या संदर्भातील नियम बदलला असून  क्लेम सादर करताना चेकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही.

ईपीएफओच्या यूएएन पोर्टलवरुन क्लेम सादर करताना आता चेकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही किंवा बँक खात्याची माहिती देखील द्यावी लागणार नाही. याशिवाय ज्या कंपनीत नोकरी करता तिथून वेरिफिकेशनची गरज लागणार नाही. यापूर्वी क्लेम सादर करताना बँख खात्याच्या एक कॅन्सल चेकचा फोटो किंवा पासबूकची पडताळणी केलेली कॉपी अपलोड करावी लागत असे. याशिवाय जिथं नोकरी करतो तिथून बँक खातं  वेरिफाय करावं लागत होतं.

ईपीएफओकडून दोन्ही प्रक्रिया समाप्त करण्यात आल्या आहेत. आता बँक खातं पहिल्यांपासून यूएएन खात्याशी लिंक असतो आणि वेरिफाय केलेला असतो. यामुळं अतिरिक्त कागदपत्रांची गरज लागत नाही यामुळं क्लेम नाकारला जाण्याची शक्यता कमी होते. खराब किंवा अस्पष्ट अपलोड केलेल्या फाईलमुळं निर्माण होणाऱ्या तक्रारी घटतील.

ही सूट यापूर्वी काही केवायसी वेरिफाय असलेल्या सदस्यांसाठी लागू होती. ही सुविधा 28 मे 2024 ला सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत याचा फायदा 1.7 कोटी सदस्यांना झाला आहे. आता ही सुविधा सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे.

ईपीएफओचे 7.74 कोटी सक्रीय दस्य आहेत. ज्यामध्ये 4.83 कोटी सदस्यांनी आपली बँक खाती यूएएन क्रमांकाशी लिंक केलेली आहेत. तर, 14.95  लाख सदस्यांची बँक खाती सध्या एम्पलॉयर जवळ प्रलंबित आहेत. आता एम्पलॉयरच्या मंजुरीची आवश्यकता नाही. त्यामुळं या सदस्यांना दिलासा मिळेल आणि क्लेमची प्रक्रिया  वेगवान होईल.

बँक खातं बदलण्याची प्रक्रिया देखील सोपी

ज्या सदस्यांना यूएएन क्रमांकासोबत जोडलेले बँक खातं बदलायचं असल्यास आणि नवा बँक खाते क्रमांक जोडायचा असल्यास ही प्रक्रिया देखील सोपी करण्यात आली आहे. नवा बँक खाते क्रमांक, आयएफसी क्रमांक आणि ओटीपी नोंदवून वेरिफाय करा. यामुळं पीएफ क्लेम मंजूर होण्याची प्रक्रिया वेगवान होईल.

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.