Pune Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार; पतीला अटक
esakal April 02, 2025 04:45 AM

पुणे - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना तळजाई वसाहतीत घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

पूनम दत्ता अडागळे (वय-३२, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, पती दत्ता राजाराम अडागळे (वय ३८) याला अटक केली आहे. याबाबत पूनम हिने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आणि दत्ता यांचा विवाह २०१५ मध्ये झाला आहे. पूनम घरकाम करून उदरनिर्वाह करत होती. सोमवारी (ता. ३१) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नी पूनमकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

मात्र, तिने नकार दिल्याने दत्ताने रागाच्या भरात कुऱ्हाडीने पूनमवर वार केला. त्यात पूनमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रेश्मा साळुंके करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.