बीड : शिक्षक धनंजय नागरगोजे या शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येमुळे विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बीडमधील विनाअनुदानित शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला आहे. बीडमधील शिक्षकांनी आठ दिवसापासून शिक्षकांचे उपोषण सुरू केले आहे. याच शिक्षकांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.
बीडमधील शिक्षक उपोषणाला बसले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या शिक्षकांचं उपोषण सुरु आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडच्या दौऱ्यावर असणार आहेत. बीडमधील उपोषणकर्ते शिक्षक उद्या म्हणजे बुधवारी अजित पवारांची भेट घेणार आहेत. याच शिक्षकांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. इशाऱ्यानंतर अजित पवारांकडून काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
शिक्षकांचं म्हणणं काय?आम्ही गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहोत. साधा आम्हाला एक फोन देखील कोणी केला नाही. तसेच आम्हाला भेटायला आले नाही. ही लाजिरवाणी बाब आहे, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. धनंजय नागरगोजे या शिक्षकाने फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली. आम्ही त्याच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी उपोषण करत आहोत, सरकारने याची दखल घ्यावी, असे शिक्षक म्हणाले.
उपमुख्यमंत्री उद्या बीडमध्ये येत आहेत. त्या आधी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर त्यांना आम्ही घेणार आहोत. त्यांच्यासमोरच आमचं जीवन संपवणार आहोत, असा इशारा शिक्षकांनी प्रतिक्रिया देताना दिला. आमच्या जीवाचे बरं वाईट झालं, तर सर्वस्वी जबाबदारी सरकार असेल, असा इशारा देखील शिक्षकांनी दिला आहे.
शिक्षकाने संपवलं होतं जीवनधनंजय नागरगोजे या शिक्षकाला १८ वर्षांपासून संस्थाचालकांनी पगार दिला नव्हता. पगार न मिळाल्याने शिक्षक धनंजय यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. विधानपरिषदेतही या मुद्द्यावर चर्चा झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना पगार न देणाऱ्या संस्थाचालकांना तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती.