Aljapur : आळजापुरात भांडण सोडविणाऱ्या युवकाचा खून; पारावरून ढकलले, उपचारादरम्यान मृत्यू
esakal April 02, 2025 03:45 PM

वैराग : भावाचे अन्य एकासोबत सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर त्याने पाराच्या कठड्यावरून ढकलून दिले. या घटनेत डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एकावर वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना आळजापूर (ता. बार्शी) येथे सोमवारी सायंकाळी सात वाजता घडली. अमोल अंगद आग्रे (वय २८) असे मृताचे नाव आहे.

मृताचा भाऊ संजय अंगद आग्रे याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मयूर अनिल दराडे (रा. आळजापूर) याच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संजय आग्रे हा सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास वेशी जवळील पारावर बसला होता. दरम्यान संशयित आरोपी मयूर दराडे हा तेथे आला.

किरकोळ कारणावरून वाद वाढला. त्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान फिर्यादीचा भाऊ अमोल आग्रे हा तेथे भांडण सोडवण्यासाठी आला असता दराडे याने तू कशाला मधी आला आता तुला बघून घेतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने पाराच्या कठड्यावरून जोरात ढकलुन दिले. त्यावेळी अमोलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तुळजापूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मयूर दराडे याच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर हा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सापडला नव्हता. पोलिस त्याच्या मागावर होते. लवकरच त्यास अटक केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या खून प्रकरणानंतर गावात तणावाचे वातावरण होते.

गावात तणावाचे वातावरण

आळजापूर येथे घटनास्थळी बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयित आरोपी रात्री नऊ वाजेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नव्हता. दरम्यान आरोपी सापडत नाही तोपर्यंत मृतावर अंत्यसंस्कार न करण्याचा नातेवाईकांनी निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गावात तणावाचे वातावरण होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.