संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या चौकशीत धक्कादायक असे खुलासे झाले आहेत. सीआयडीला दिलेल्या जबाबात सुदर्शन घुलेनं सांगितलं की, भाऊ प्रतीक घुले यानं सरपंच देशमुख यांच्या तोंडावर लघुशंका केली. त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या छातीवर उडी मारली. सीआयडी जबाबाबत संतोष देशमुख यांचे अपहरण, मारहाण आणि मृत्यूनंतर काय केलं याची माहिती सुदर्शन घुलेनं सीआय़डीला दिलेल्या जबाबाब दिलीय.
वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यासह इतरांवर संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येचा आरोप आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे यांनी सरपंच संतोष देशमुखांच्या अपहरणाचा प्लॅन केला. यासाठी कृष्णा चाटेनं भाड्यानं कार आणळी. तर सुदर्शनकडं काळी जीप होती.
संतोष देशमुख हे त्यांच्या मावसभावासह कारमधून येताना दिसताच एक गाडी मागे आणि एक पुढे लावून अडवलं. त्यानंतर दगडानं काच फओडून सरपंच देशमुख यांना मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून टोलनाक्यावरून देशमुखांचे अपहरण केल्यानंतर टाकळी शिवारात मारहाण केली. या मारहाणीतच सरपंच देशमुख यांचा मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर जयराम चाटे याला देशमुखांना कपडे घालायला लावले. तिथून गाडीत बसून सगळे तुरीच्या शेतात लपून बसले. अंधार पडेपर्यंत ते सगळे शेतातच थांबले. त्यानंतर दैठणा फाटा इथं मृतदेह टाकून दिला आणि वाशीच्या दिशेने निघून गेल्याचं सुदर्शन घुलेनं जबाबात सांगितलंय.
सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांना तब्बल दोन तास मारहाण केली. क्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप, लाकडी काठी अशा हत्यारांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीवेळी संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघुशंका केली. त्यानंतर प्रतीक घुलेनं देशमुखांच्या छातीवर उडी मारली. यानंतर देशमुखांना रक्ताची उलटी झाली. या मारहाणीवेळी दोन वेळा विष्णू चाटेशी मोबाईलवर बोलल्याचंही सुदर्शन घुलेनं सीआयडी चौकशीत सांगितलंय.