विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी
Solapur Latest News : नवऱ्याचा विरह सहन न झाल्यामुळे बायकोनेही त्याच ठिकाणी आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. गुढी पाडव्याच्या रात्री नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नवरा गेल्यामुळे अतीव दुख झालेल्या पत्नीनेही दुसऱ्या दिवशी आय़ुष्य संपवले. पतीने ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने साडीने गळफास घेऊन पत्नीने आत्महत्या केली आहे. ही हृदयद्रावक घटना सोलापूरच्या भगवान नगर झोपडपट्टीजवळील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ घडली आहे.
पूजादेवी विनायक पवार असे आयुष्य संपवणाऱ्या महिलेचे नाव आहे, तर विनायक पवार असे तिच्या पतीचे नाव आहे. ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी मध्यरात्री मयत पूजादेवीचा पती विनायक याने भगवाननगर झोपडपट्टीजवळील सार्वजनिक पाण्याच्या टाकीला असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्या पाण्याच्या टाकीच्या अँगलला पतीने गळफास घेऊन केली, अगदी त्याच ठिकाणी त्याच वेळेला पत्नीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्षणिक आवेशातून दोघांचे प्राण गेले, मात्र यामुळे आठ वर्षांचा हर्ष आणि चार वर्षांची महालक्ष्मी ही चिमुकले मात्र पोरके झाले. यातील पाडव्यादिवशी केलेला विनायक पवार तसा हरहुन्नरी तरुण. पेंटिंगची कामे करायचा. त्याने अन्य भावांनाही या कलेत पारंगत केले.दोघा पती-पत्नीमध्ये (विनायक-पूजादेवी) कुरबुरी व्हायच्या, मात्र त्या तेवढ्यापुरत्याच. दोघेही एकमेकांशिवाय राहायचे नाही. घटनेपूर्वी झालेल्या भांडणातून दोघांनाही आपला जीव गमावावा लागेला.
यातील मयत विनायक आणि पूजादेवी यांचे लग्न नात्यातच झालेले होते. मामाची मुलगी पूजादेवीशी विनायकचे लग्न झाले होते. दोघांच्या जाण्याने हर्ष आणि महालक्ष्मी ही दोन चिमुकले अनाथ झाली आहेत. यातील आठ वर्षांचा हर्ष आर आर बुर्ला प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहे. चार वर्षांची महालक्ष्मी याच शाळेत लहान गटात शिकत आहे.