सावकाराने बळकावला एक कोटीचा फ्लॅट
esakal April 02, 2025 11:45 PM

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : व्याजाने घेतलेली चार लाख २० हजारांची रक्कम देता न आल्याने व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्तीने कर्जदाराच्या मालकीचा एक कोटीचा फ्लॅट बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कौशिक अनम असे या व्यक्तीचे नाव असून, नेरूळ पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार साधना तरवडे (५३) यांनी २००६ मध्ये नेरूळ सेक्टर- ४ मधील आनंदवन को. हौ. सोसायटीतील फ्लॅट विकत घेतला होता. त्यानंतर तरवडे कुटुंबीय त्या फ्लॅटमध्ये राहत होते. आर्थिक अडचणीमुळे तरवडे कुटुंबीयांनी २०१५ मध्ये सावकारी करणाऱ्या कौशिक अनम याच्याकडून चार लाख २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या रकमेच्या हमीपोटी अनम याने तरवडे कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या नेरूळ येथील आनंदवन सोसायटीतील फ्लॅटची मूळ कागदपत्रे घेतली होती. दरम्यानच्या कोरोनामुळे तरवडे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे कौशिक अनम याच्याकडून व्याजाने घेतलेली रक्कम परत करता आली नाही. त्यामुळे अनम याने फ्लॅट त्याच्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावला. त्यासाठी त्याने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्याबाबत तरवडे कुटुंबीयांनी नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २०२० मध्ये तरवडे कुटुंबीयांनी आपला फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर ते पुण्यात राहण्यासाठी गेले. याच कालावधीत अनम याने बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे साधना तरवडे यांच्या मालकीचा फ्लॅट स्वत:च्या नावावर करून घेतला.
---------------
लाइटबिलाच्या नावावरून बनावटगिरी उघड
लाइटबिलावर कौशिक अनम याचे नाव आल्याने भाडोत्रीने त्याबाबतची माहिती तरवडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी नेरूळ येथील एमएसईबी कार्यालयात कागदपत्रांची पहाणी केली असता, कौशिक अनम याने साधना तरवडे यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या नावाने तयार केलेले बनावट कुलमुखत्यारपत्र सादर केल्याचे आढळून आले. तसेच त्याच बनावट कागदपत्रांच्या आधारे तरवडे यांच्या फ्लॅटची ठाणे येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याचे आढळून आले. करारनाम्यामध्ये आनंदवन सोसायटीच्या अध्यक्ष व सेक्रेटरीच्या बनावट सह्या असलेल्या सोसायटीच्या खोट्या लेटरहेडवर फ्लॅट विक्रीबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र तयार केल्याचे आढळून आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.