आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं घसरणार, भारतात सोने दरात 9 हजारांच्या घसरणीचा तज्ज्ञांचा अंदाज
Marathi April 03, 2025 08:24 PM

नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांमध्ये सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 1 जानेवारीपासून सोन्याच्या दारात जवळपास 18% वाढ झाली आहे. 1986 नंतर पहिल्या तिमाहीमध्ये सोने दरात इतकी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅक्स लादण्याची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या दारात आणखी उसळी पाहायला मिळाली मात्र काही तज्ज्ञांच्या मते यानंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते.

वित्तीय सेवा देणाऱ्या निर्मल बंग यामधील कमोडिटी आणि करन्सी रिसर्च चे हेड कुशल शहा यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर खाली येतील असा अंदाज व्यक्त केला. सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 2800-2850 डॉलर प्रति औंस पर्यंत खाली येऊ शकतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 3127 डॉलर प्रति औंस इतका आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 10 टक्क्यांनी घसरला तर भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर घसरू शकतात. मनी कंट्रोल हिंदिनम याबाबत वृत्त दिलं आहे.

जर भारतीय बाजाराचा विचार केला असता सोन्याचा दर 90300  प्रति 10 ग्रॅम असा धरला तर सोन्याच्या दरात 10.46 टक्क्यांनी घसरण झाल्यास सोन्याचे दर 9000 रुपयांपेक्षा अधिक खाली येऊ शकतात. म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचे दर 80 ते 81 हजार रुपयांदरम्यान येऊ शकतात.

सोन्याचे दर का घसरतील?

कुशल शहा यांच्या मते सोन्याच्या दरात तेजी येण्याची जी सर्व कारणं होती ती पूर्ण झाली आहेत. व्याज दरातील संभाव्य कपात आणि केंद्रीय बँकांकडून होणारी खरेदी यांचा देखील त्यात सावेश आहे. सोन्याच्या किमती वर्षाच्या शेवटी असायला हव्या होत्या तो टप्पा पहिल्यांदा पार झाला आहे.

शहा यांच्या मते प्रत्यक्ष बाजारात जाऊन सोने खरेदी करण्याची मागणी घटली आहे. मात्र, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत, याचं कारण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.  सोने खरेदीमध्ये सहमती ट्रेडिंग सुरु आहे. म्हणजेच अनेक लोक कोणताही फार विचार न करता सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळं सोन्याचं मार्केट ओव्हरहिटेड मार्केट बनलं आहे. यामध्ये अस्थिरता किंवा दरात घसरणीची शक्यता वाढली आहे.  सोन्याच्या दरात तात्कालिक कारणांमुळं वाढल्या आहेत. त्यामुळं सोन्याचे दर फार जास्त राहू शकणार नाहीत ते घसरु शकतात.

शाह यांच्या मते, येत्या 10 ते 30 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण येऊ शकते. सोन्यातील गुंतवणूकदारांनी नफा कमवण्याचा विचार करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. शाह यांच्या सल्ल्यानुसार सोन्यातील गुंतवणूक कायम ठेवण्याऐवजी सोन्यातील नफा बुक करा आणि चांदीमध्ये गुंतवणूक करावी. गेल्या चार वर्षांपासून चांदीच्या पुरवठ्यामध्ये तूट पाहायला मिळत आहे. त्यामुळं चांदी येत्या सहा ते सात महिन्यात  10 ते 15 टक्के रिटर्न देऊ शकते, असा अंदाज  शाह यांचा आहे.

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.