बंगळूर : दुचाकी अडवून भावावर हल्ला करून त्याच्या धाकट्या बहिणीचे अपहरण करण्यात आले आणि नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या अमानुष कृत्याने राजधानी बंगळूर (Bangalore) हादरले आहे.
के. आर. पुरम (K. R. Puram Railway Station) बुधवारी (ता. २) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आऊटर रिंगरोडवरील लॉरी मेमोरियल स्कूलजवळील महादेवपूरच्या दिशेने ती भावासोबत दुचाकीवरून जात होती. मूळचे बिहारचे असलेले बहीण, भाऊ दुचाकीवरून जात होते. दोन रिक्षाचालकांनी त्या दोघांना अडविले. दोघांनी तरुणीचे अपहरण केले.
प्रतिकार करणाऱ्या मोठ्या भावावर त्यांनी हल्ला केला. तरुणीला ओढून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. सय्यद मसूर आणि आसिफ अशी या रिक्षाचालकांची नावे आहेत. तरुणी केरळमधील एर्नाकुलमहून बंगळूरमधील के. आर. पुरम रेल्वे स्टेशनवर आली होती. तिने तिच्या पणजीतील मावशीच्या मुलाला फोन करून बंगळूरला येण्याबद्दल सांगितले होते.
भावाच्या सूचनेनुसार के. आर. पुरम येथे उतरली. ती तरुणी तिच्या भावासोबत जेवणासाठी महादेवपूरकडे जात होती. यादरम्यान, दोघा रिक्षाचालकांनी दुचाकी अडवून तिच्या भावावर हल्ला केला. तरुणीला निर्जन भागात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. भावावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्याच्याकडून या घटनेची माहिती मिळाली, असे व्हाईट फील्डचे पोलिस उपायुक्त शिवकुमार गुणरे यांनी सांगितले.
जेव्हा तरुणीने मदतीसाठी आरडाओरड केली, तेव्हा स्थानिक लोक धावत आले आणि त्यांनी एका पुरुषाला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आणखी एका संशयिताला अटक केली. त्यांची चौकशी सुरू आहे.