पिंपरी, ता. २ : शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्कॉफ) भरण्यासाठी आता १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे.
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्कॉफ) भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, काही समस्या उद्भवत असल्याने काही शिक्षक संघटनांकडून त्यामध्ये मुदतवाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.
आजतागायत १०० टक्के शाळांची स्वयं-मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली दिसून येत नाही. त्यामुळे, शाळांचे स्वयं-मूल्यांकन होण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी सहसंचालक, उपसंचालक यांनी आपल्या विभागातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन नोंदणी व पूर्तता विहित कालावधीत १००टक्के होईल, याची दक्षता घ्यावी, असे पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.