अपयशाकडे अनुभवाच्या दृष्टीने पाहा
esakal April 02, 2025 11:45 PM

55038

अपयशाकडे अनुभवाच्या दृष्टीने पाहा

डॉ. अनिल नेरुरकर ः कुडाळ महाविद्यालयात दीक्षांत समारंभ

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः बाहेरच्या जगाची ओळख होताना प्रसंगी अपयश येईल; मात्र मन घट्ट करून मनाच्या व बुद्धीच्या कक्षा वाढविणे गरजेचे आहे. मला काय करायचे आहे, हे निश्चित करून प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन क.म.शि.प्र. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. अनिल नेरुरकर यांनी केले. येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये विद्यापीठ दीक्षांत समारंभाच्या स्वरुपात पदवी व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भवताल मंचाचे संस्थापक, लेखक अभिजित घोरपडे, क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, जिव्हाळा आश्रमचे सुरेश बिर्जे, भाई तळेकर, प्रा. ए. एन. लोखंडे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी प्रास्ताविक करून सोहळ्याचे प्रयोजन सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थांनी स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
एम.एस्सी. गणित विषयात मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम येत सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या ओंकार तेंडोलकर, प्राची देसाई, सुप्रिया सामंत, दीपस्वी गावडे, भावना लोहार, प्रतीक्षा गोसावी, नेहा रावराणे, गीता गावडे, सुजन प्रभूखानोलकर, शिल्पा म्हापणकर, डिसोझा विल्सन, सारा शेख, मैथिली ओटवणेकर, किमया गोवेकर या स्नातकांना तसेच समीर दंताळ, आलिया खान, तेजश्री तळेकर, शिवानी रेगे या पदव्युत्तर स्नातकांना गौरविण्यात आले. विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. भास्कर यांनी करून दिला. अहवाल वाचन प्रा. एम. एन. जांभळे यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. वाय. ठाकूर यांनी केले. आभार प्रा. डॉ. एस. टी. आवटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.सुरवसे, प्रा. भास्कर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
---
प्रयत्नात कसर सोडू नका ः घोरपडे
श्री. घोरपडे यांनी, कृती हीच तुमची ओळख असते. आज सर्वांना समान संधी असताना प्रयत्नात कोणतीही कसर सोडू नका, असे आवाहन केले. अरविंद शिरसाट यांनी पदवीचे महत्त्व पटवून देत स्नातक, विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सुरेश बिर्जे यांनी, जीवनातील आजचा क्षण अविस्मरणीय असून तो शब्दांत व्यक्त न करण्यासारखा आहे, अशा भावना व्यक्त केल्या. जिव्हाळा आश्रमाची वेबसाईट तयार करणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण व वार्षिक पारितोषिक वितरण झाले. स्नातकांना प्राचार्य डॉ. सुरवसे यांनी शपथ दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.