विक्रमगडमध्ये बेस्ट पोलिस ऑफ द मंथ उपक्रम
विक्रमगड, ता. २ (बातमीदार) ः पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे मनोबल वाढवून कामकाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विक्रमगड पोलिस ठाण्यातर्फे बेस्ट पोलिस ऑफ द मंथ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
पोलिस अधिकारी व अंमलदार यांची कार्यक्षमता तसेच कामकाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता विक्रमगड पोलिस ठाण्यातर्फे बेस्ट पोलिस ऑफ द मंथ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत पोलिस अधिकारी व अंमलदार यांना कामकाजाचे निकष ठरवून देण्यात आलेले आहेत. त्या निकषाप्रमाणे जे पोलिस अधिकारी व अंमलदार दैनंदिन कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडतील, अशा अधिकारी व अंमलदार यांची गुणांकन पद्धतीने निवड करून त्यांना बेस्ट पोलिस ऑफ द मंथ या सन्मानाने पुरस्कृत करण्यात येणार आहे.
.........................
नुकतेच फेब्रुवारीमध्ये विक्रमगड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या कामगिरीचा आढावा घेतला असता, पोलिस हवालदार मुकुंद रडका भोगाडे यांनी सुमारे ११ महिन्यांपासून फरार असलेल्या बंदी आरोपीचा अत्यंत शिताफीने शोध घेऊन त्यास पकडून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच वसंता लोखंडे यांनी पोलिस ठाण्यातील सीसीटीएनएस या ऑनलाइन कार्यप्रणालीचे उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. त्यामुळे दोन्ही पोलिस अंमलदार यांनी दिलेल्या निकषाप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना फेब्रुवारीमध्ये बेस्ट पोलिस ऑफ द मंथ या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तसेच यापुढेदेखील पोलिस ठाणेअंतर्गत अधिकारी व अंमलदार यांचे दैनंदिन कामकाज व विशेष कामगिरीबाबत आढावा घेऊन त्यांची गुणांकन पद्धतीने निवड केली जाईल, अशी माहिती विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी दिली.