सोलापूर - मुख्यमंत्र्याच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात १०० दिवसांत एक लाख ६० हजार ५४४ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सातारा जिल्ह्यासह राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टाच्या ५० टक्के सुद्धा कामे पूर्ण झाली नाहीत. १०० दिवसांत राज्यात ७९ हजार घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत.
महायुती सरकारला १०० दिवस पूर्ण होण्यापूर्वी विविध विभागांना कामांचे उद्दिष्ट देऊन ते पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सातारा जिल्ह्यात १०० दिवसांत ९४२ घरकुलांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होती, पण २ एप्रिलपर्यंत अवघी ४३० घरकुले पूर्ण झाली आहेत.
जिल्हा दरसुचीनुसार (डीएसआर) २६९ चौरस फुटाच्या घरकूल बांधकामासाठी दोन लाख २५ हजार रुपये लागतात. पण, सध्या आवास योजनेतील लाभार्थींना एक लाख २० हजार रुपयांचेच अनुदान मिळते. दुसरीकडे वाळू लिलाव बंद आणि सुधारित वाळू धोरण अजूनही अंतिम न झाल्याने बेघर लाभार्थींना घरकुलासाठी मोफत वाळू मिळत नाही.
‘या’ १५ जिल्ह्यांची सुमार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर (४७ टक्के), सातारा (४६ टक्के), चंद्रपूर (४४ टक्के), ठाणे (४३ टक्के), सोलापूर (४३ टक्के), जालना (३८ टक्के), पुणे (३७ टक्के), कोल्हापूर (३६ टक्के), धुळे (३० टक्के), नाशिक (३० टक्के), नांदेड (२९ टक्के), अहिल्यानगर (२७ टक्के), यवतमाळ (२५ टक्के), पालघर (१२ टक्के), नंदुरबार (८ टक्के).
सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ५५८ बेघर लाभार्थींनी १०० दिवसांत घरकूल बांधून पूर्ण करणे अपेक्षित असून आतापर्यंत दीड हजार लाभार्थींची घरे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील ६२ हजार घरकुलांना मंजुरी दिली असून त्यांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने दर आठवड्याला आढावा घेतल जातोय.
- रतीलाल साळुंखे, समन्वयक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर