संजय गडदे, साम टीव्ही
म्हाडाच्या रहिवाशांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. म्हाडाच्या 34 वसाहतींमधील रहिवाशांना अवघ्या एक रुपयात वैद्यकीय उपचार मिळणार आहे. म्हाडाच्या ३४ वसाहतींमध्ये स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी म्हाडाचा 'आपला दवाखाना' उभारणीकरिता वन रूपीक्लिनिक सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ११४ अभिन्यासातील ३४ वसाहतींमध्ये 'आपला दवाखाना' ही योजना राबवण्यात येणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाने मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल या खासगी संस्थेच्या वन रूपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार केला आहे. रक्त तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी सारख्या सुविधा केवळ १० रुपयांमध्ये केल्या जाणार आहेत.
म्हाडातर्फे वन रूपी क्लिनिक संस्थेला म्हाडा वसाहतींच्या आवारात ४०० चौरस फुटांची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरुवातीला म्हाडाच्या कुलाबा कफ परेड, चेंबूर, पंतनगर- घाटकोपर, कन्नमवार विक्रोळी, महावीर नगर कांदिवली, प्रतिक्षा नगर, सायन, अंटोप हिल-वडाळा, आदर्श नगर-ओशिवरा, सांताक्रूझ अंधेरी, वांद्रे , जुहू, कुर्ला, मानखुर्द , माहीम, कांदिवली, बोरीवली येथील म्हाडा वसाहतीत वन रुपये क्लिनिक उभारले जाणार आहेत.
पत्राचाळमधील रहिवाशांच्या घरांसाठी ऑनलाइन पद्धतीने सोडतगोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील पात्र अधिकृत सभासदांना पुनर्वसित घर वितरणासाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील एस व्ही रोडवरील सरदार वल्लभ भाई सभागृहात 4 एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. त्यामुळे हक्काच्या घरापासून वंचित राहिलेल्या ६७२ रहिवाशांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.