Dhananjay Munde : अजित पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडेंची दांडी; पण मुलीच्या मुंबईतील फॅशन शोला मात्र उपस्थिती
esakal April 03, 2025 06:45 AM

मुंबई - उपमख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. मुंडे यांनी प्रकृतीचा दाखला देत मुंबई गाठली असली, तरी त्यांच्या मोठ्या मुलीच्या फॅशन शोला मात्र त्यांनी हजेरी लावली.

मुंडे यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे अजित पवारांच्या या दौऱ्यात आपण का गैरहजर आहोत, याचे स्पष्टीकरण देताना प्रकृतीचे कारण दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

मात्र प्रत्यक्षात मुंडे मंगळवारी त्यांच्या मोठ्या मुलीचा सहभाग असलेल्या फॅशन शोला उपस्थित होते. त्यांची मोठी कन्या फॅशन डिझायनर आहे. त्यानंतर तिचा हा पहिलाच शो होता. यात तिने डिझाइन केलेल्या काही वेशभूषा वापरण्यात आल्या. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे हा फॅशन शो मंगळवारी रात्री पार पडला.

आजारपणामुळे मुंडे गैरहजर

सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची छायाचित्रे समोर आल्याने मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मुख्य प्रवाहापासून ते दूर असल्याचे दिसते. पाडव्यादिवशी परळीतील कार्यक्रमांना त्यांची हजेरी दिसली. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात ते अनुपस्थित होते. आजारी असल्याने आपण रुग्णालयात दाखल होणार असून येऊ शकणार नाही, असे मुंडे यांनी आपणाला कालच सांगितले होते, असे पवार यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने मंगळवारी मला उपचारासाठी मुंबईला यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी पक्षनेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती.

- धनंजय मुंडे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.