बीड - तरुण कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम करावे, प्रतिमा स्वच्छ ठेवावी, चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घालू नये. वाळू, राख माफियागिरी मोडीत काढून बीड जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर न्यायचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. आई-वडील, चुलत्यांच्या कृपेने आपले चांगले चाललेय, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथे बुधवारी (ता. दोन) युवा संवाद मेळावा, पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रकाश सोळंके, सतीश चव्हाण, विजयसिंह पंडित, विक्रम काळे आदी उपस्थित होते. बळिराम गवते यांच्या पुढाकाराने युवा संवाद मेळावा झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख शेख निजाम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
पवार म्हणाले, ‘बीड ही संत-महंतांची भूमी आहे. सीतेच्या अपहरणावेळी रावण आणि जटायू यांच्यातील लढाई बीडच्याच भूमीत झाल्याने रावणासारख्या अपप्रवृत्तींना रोखण्याची ताकद जिल्ह्याच्या मातीत आहे. बीडची बदनामी करणाऱ्या गोष्टी थांबायला हव्यात, जातीजातींमधील अंतर कमी व्हायला हवे. त्यासाठी बळिराम गवते यांच्या नेतृत्वाखाली युवक आघाडीने पुढाकार घ्यावा’.
कोणी मोठा हार आणला तर याने काहीतरी चुकीचे केलेय, हे लक्षात येतंय. पुढाऱ्यांच्या पाया पडू नका, त्यांचा भूतकाळ तपासा, असे आवाहन करत आपल्याला मुर्ती वगैरे भेट नको, कारण आई-वडील व काकांच्या कृपेने आपले चांगले चाललेय, असे अजित पवार म्हणाले.
कार्यकर्त्यांची पार्श्वभूमी तपासा
पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेताना त्यांची पार्श्वभूमी तपासा.आपणही पोलिस अधीक्षकांकडून अनेकांच्या रेकॉर्डची माहिती घेतल्याचे अजित पवार म्हणाले. चुकीच्या गोष्टीची किंमत पक्षश्रेष्ठींना मोजावी लागते. कोणाला पाठीशी घालणार नाही. चुकीचे काम करणाऱ्यांवर ‘मकोका’ नुसारही गुन्हे नोंद करू. दहा लाखांच्या कामांचे तुकडे करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कर्जमाफीबद्दल बोललो नव्हतो!
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असे कधीच बोललो नव्हतो. पैशाचे सोंग आणता येत नाही. एखादा निर्णय घेताना राज्याचा विचार करावा लागतो, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिली. मी कामाचा माणूस, शब्दाचा पक्का आहे. फालतू गप्पा जमत नाहीत. आता प्रशासनाला काम करायला भाग पाडणार आहे. त्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार आहे, असे त्यांनी सांगितले.