मेट्रो-3च्या दुसऱ्या टप्प्याची डेडलाइन हुकली
Marathi April 03, 2025 09:24 AM

मुंबई मेट्रो-3 भुयारी मार्गिकेचा दुसरा टप्पा प्रवासी सेवेत कधी दाखल होणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. हा टप्पा मार्चअखेरीस खुला करू, असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते, मात्र बीकेसी ते वरळी प्रवासासाठी सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने मार्चचीही डेडलाइन चुकली आहे.

आरे-जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ते कफ परेडपर्यंत एकूण 33.5 किमी लांबीचा मेट्रो-3 मार्गिकेचा प्रकल्प आहे. मुंबईतील या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेचा आरे-जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) हा 12.69 किमीचा पहिला टप्पा गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रवासी सेवेसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर बीकेसी ते वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा मार्च अखेरीपर्यंत खुला करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीनंतरच्या 100 दिवसांतील अजेंडय़ामध्ये या मार्गिकेच्या विस्ताराचा समावेश केला होता, मात्र दुसऱ्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्राचाच अद्याप पत्ता नसल्यामुळे महायुती सरकारचे निवडणूक काळात दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिलेल्या मार्चच्या डेडलाइनचा फज्जा उडाल्याने मुंबईकरांची निराशा झाली असून मेट्रो वरळीपर्यंत कधी धावणार, अशी विचारणा मुंबईकर करू लागले आहेत. सुरक्षा प्रमाणपत्राबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडेही  ठोस उत्तर नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.