लोकसभेत वक्फ बील मंजूर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) याची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अखेर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यावर निशाणा साधत, "गोमांस खाण्याचं समर्थन करणाऱ्यांनी वक्फ बिल मांडलं आहे," असं वक्तव्य केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांनी देशवासीयांना विश्वासात घ्यायला हवं. वक्फच्या जमिनींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे. भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत."
कलम ३७० रद्द करण्यावर भाष्यउद्धव ठाकरेंनी कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट केलं, "आम्ही कलम ३७० रद्द करण्यास समर्थन दिलं होतं, पण आता प्रश्न असा आहे की, किती काश्मिरी पंडितांना त्यांच्या घराची परतफेड झाली आहे? त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कोणते ठोस उपाय केले?"
वक्फ बिलामुळे हिंदू-मुस्लिम वाद वाढवण्याचा प्रयत्न?शिवसेना प्रमुखांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हटलं की, "वक्फ बोर्ड हिंदुत्वाच्या हिताचं असेल, तर हिंदुत्व कोणी सोडलं? हे बील न आणताही भाजपला जे करायचं होतं, ते त्यांनी केलं असतं. कायद्यात पारदर्शकता असावी हे मान्य, पण मुद्दाम हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण केला जातोय."
अमित शहांच्या भाषणावर निशाणागृहमंत्री अमित शहा यांच्या कालच्या भाषणाचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांचं भाषण मुस्लिमांच्या विरोधात होतं की त्यांच्या समर्थनात, हे स्पष्ट झालेलं नाही. सगळं व्यवस्थित सुरू असताना काही मुद्दे उगाच उकरून काढले जात आहेत. नरेंद्र मोदी निवडून आले नसते, तर वक्फ बोर्ड संसदेवर दावा सांगितला असता, असं किरेन रिजिजू म्हणाले होते. मात्र, हा दावा वक्फ बोर्डाने फेटाळून लावला आहे."
वक्फच्या जमिनी विकून उद्योगपतींना देण्याचा डाव?नी आरोप केला की, "वक्फच्या जमिनी विकून त्या उद्योगपतींना देण्याचा डाव आखला जात आहे. आम्ही भाजपला विरोध केला नाही, पण भाजपच्या ढोंगी राजकारणाला विरोध केला. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुस्लिमांना देशद्रोही म्हटलं नव्हतं."
"मुसलमानांचा राग असेल, तर झेंड्यांवरून हिरवा रंग काढा!"भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रहार करत उद्धव ठाकरे म्हणाले, "जर मुसलमानांविषयी भाजपला इतकाच राग असेल, तर त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यावरील हिरवा रंग आधी काढावा. भाजपची रणनीती म्हणजे फटाक्याची वात लावायची आणि मग स्वतः पळून जायचं!"
"आम्ही काय खावं, ते भाजप लादणार असेल, तर सहन करणार नाही!"अन्न आणि जीवनशैलीवर सरकारी हस्तक्षेप नको, असं स्पष्ट करत उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही काय खावं, काय नाही, हे जर भाजप लादणार असेल, तर आम्ही सहन करणार नाही. पंतप्रधानांनी अर्थसंकटावर बोलायला हवं. वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध?"
उद्धव ठाकरे यांनी वक्फ बील, हिंदुत्व, आणि भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका करत त्यांचा विरोध स्पष्ट केला. हिंदू-मुस्लिम वाद उकरून काढण्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची ही भूमिका भाजपसाठी आव्हान निर्माण करू शकते.