Mangeshkar Hospital: मंगेशकर रुग्णालयाचा बेजबाबदारपणा? भाजप आमदाराच्या पीएच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू, १० लाखांसाठी...
esakal April 04, 2025 05:45 AM

Mangeshkar Hospital: पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळं एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे वेळेत उपचारांअभावी मृत्यू झालेली महिला ही भाजप आमदाराच्या पीएची पत्नी होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार सुरु करण्यासाठी फोन येऊन देखील रुग्णालयानं प्रवेश नाकारल्यानं मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीबाबत हा प्रकार घडला आहे. प्रसूतीचा त्रास होत असल्यानं मोनाली सुशांत भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात करण्यात आलं होतं. मात्र, उपचारांसाठी हॉस्पिटल प्रशासनानं त्यांना १० लाख रुपये खर्च सांगितला. सुरुवातीला 3 लाख रुपये भरायची तयारी नातेवाईकांनी दाखवल्यानंतरही रुग्णालय प्रशासनानं ऐकलं नाही.

तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला फोनही केला. पण तरीही रुग्णालय प्रशासनानं ऐकलं नाही. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना अतिरक्तस्राव होऊन तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा दावा भाजप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. याप्रकरणाची तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू

दरम्यान, तनिषा भिसे यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला पण प्रसूती दरम्यान गुंतागुंत वाढल्यानं आईचा मृत्यू झाला. त्यामुळं दोन जिवांना जीवदान देत आईचा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.