बारामती : जलतरण तलावामध्ये पडलेली सोन्याची चेन आपणहून शोधून मूळ मालकाला परत करण्याचे दातृत्व बारामती येथील करण शेंडगे उर्फ मुन्ना यांनी दाखविले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल वीर सावरकर जलतरण तलावाचे ज्येष्ठ सल्लागार माजी नगराध्यक्ष जवाहर शहा (वाघोलीकर) यांच्या हस्ते करण शेंडगे यांचा गुरुवारी (ता. 3) सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वांनी कौतुक केले.
बारामतीत क्रिकेट सामन्याच्या निमित्त कोकणातून आलेले श्री. कांबळे हे वीर सावरकर जलतरण तलावावर पोहोण्यासाठी आले होते. पोहोतांना त्यांची दोन तोळ्याची चेन तलावात पडली. दुस-या दिवशी त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तलावावर येऊन या बाबत माहिती दिली. या तलावाचे जीवरक्षक करण शेंडगे यांनी त्यांचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला. तलाव शांत झाल्यानंतर त्यांनी पाण्यात उतरून तब्बल तीन तास या चेनचा शोध घेतला. पाण्यात त्यांना ही चेन सापडल्यानंतर कांबळे यांना बोलावून ही चेन त्यांना परत देण्यात आली.
तलावाचे माजी सचिव प्रवीण आहुजा, संचालक बाळासाहेब टाटीया, उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर, सुनील जामदार, राहुल नेवसे, अशोक शेरकर, बाळासाहेब देवकाते, नामदेव मदने, सचिव विश्वास शेळके, अध्यक्ष डॉ अशोक तांबे, व्यवस्थापक सुनील खाडे यांनी त्यांचा सत्कार केला.