IPL 2025: हे भारीये! SRH च्या गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये दोन हातांनी केली बॉलिंग आणि विकेटही घेतली; पाहा Video
esakal April 04, 2025 09:45 AM

कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुरुवारी (३ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ८० धावांनी विजय मिळवला. हा सनरायझर्स हैदराबादचा सर्वात मोठा पराभव होता. तसेच हा सनरायझर्स हैदराबादचा सलग तिसरा पराभव होता.

पण असे असले तरी सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या श्रीलंकेच्या अष्टपैलू कामिंडू मेंडिसने सर्वांचे लक्ष्य वेधले. या सामन्यातून त्याने सनरायझर्स हैदराबाद संघासाठी पदार्पण केले होते. आयपीएल २०२५ मध्ये पहिलाच सामना खेळताना त्याने अनोखा विक्रमही नावावर केला.

या सामन्यात कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १३ व्या षटकात कमिन्सने मेंडिसकडे सोपवला. त्यावेळी कोलकाताने १०० धावांचा टप्पा पार केलेला होता आणि आधीच ३ विकेट्स गमावलेल्या होत्या. कोलकाताकडून अंगक्रिश रघुवंशी आणि वेंकटेश अय्यर फलंदाजी करत होते.

फिरकी गोलंदाजी करणाऱ्या मेंडिसने या षटकात तीन चेंडू डाव्या हाताने टाकले, तर तीन चेंडू उजव्या हाताने टाकले. त्याने उजव्या हाताने टाकलेल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर अर्धशतक करणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीलाही त्याने बाद केले. रघुवंशीने ३२ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याचा चांगला झेल हर्षल पटेलने घेतला. दरम्यान, या षटकात मेंडिसने ४ धावाच दिल्या.

दरम्यान, मेंडिसने एकाच षटकात दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, पण आयपीएलमध्ये मात्र ही पहिलीच वेळ ठरली. तो आयपीएलमध्ये एकाच षटकात वेगवेगळ्या हातांनी गोलंदाजी करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

याआधी मेंडिसने २०१६ साली झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये दोन्ही हातांनी गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने नंतर श्रीलंकेकडून खेळतानाही दोन्ही हातांनी गोलंदाजी केली आहे. गेल्यावर्षी भारताविरुद्ध खेळताना त्याने सू्र्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांना एकाच षटकात दोन्ही हातांनी गोलंदाजी केली होती.

दरम्यान, गोलंदाजाला अशा प्रकारे आपल्या गोलंदाजीचा हात बदलता येतो, पण त्याबाबत त्याला आधी अंपायर्सला त्याबद्दल सांगावं लागतं.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर कोलकाताकडून रघुवंशीशिवाय वेंकटेश अय्यरनेही ६० धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे कोलकाताने २० षटकात ६ बाद २०० धावा केल्या. त्यानंतर २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १६.४ षटकात १२० धावांवरच सर्वबाद झाला.

मेंडिसने फलंदाजी करताना २० चेंडूत २७ धावाही केल्या. हैदराबादकडून त्याच्याव्यतिरिक्त फक्त हेन्रिक क्लासेनने (३३) २० धावांचा टप्पा पार केला. बाकी कोणाला खास काही करता आले नाही. वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी गोलंदाजी करताना कोलकातासाठी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.