केंद्राचा निर्णय उत्पादकांच्या मुळावर
esakal April 05, 2025 01:45 AM

सोमेश्वरनगर, ता. ४ : कांद्याचे निर्यातशुल्क हटविण्याबाबत केंद्रसरकारने केलेला अक्षम्य विलंब शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. एक एप्रिलपासून प्रत्यक्ष निर्यातशुल्क रद्द झालेले असले तरी कांद्याचे बाजारभाव वाढण्याचे सोडाच उलट भावात घटच झाली आहे. पुणे आणि लोणंद बाजार समितीत मार्चअखेरीस असलेले कांद्याचे भाव शंभर ते दीडशे रुपये प्रतिक्विंटलने घटले आहेत. यामुळे आता केंद्रसरकारने कांदाखरेदी करावी आणि शेतकऱ्यांना अनुदान देऊन चूक निस्तरावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

केंद्रसरकारने २२ मार्च रोजी वीस टक्के निर्यातशुल्क एक एप्रिलपासून शून्यावर आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांद्याच्या भावात वाढ होईल असा डांगोरा पिटण्यात आला. उलट ३१ मार्चला पुणे बाजार समितीत कांदा ८०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलने विकला होता. तो आज ७०० ते १७०० रुपयांवर आला आहे. लोणंद बाजार समितीत २४ मार्चला ८०० ते १७५० रुपये प्रतिक्विंटलने कांदा विकला तो आज ७०० ते १६११ रुपयांवर आला आहे. सरासरी दर तर १३०० ते १५०० रुपयांवरच आहे.
केंद्रसरकराने २०२३ मध्ये कांदा निर्यातीवर बंदी घालत तोंडचा घास काढून घेतला. गतवर्षीही ऐन हंगामात मार्च २०२४ मध्ये अनिश्चित काळासाठी निर्यातबंदी लागू केली. मे २०२४ मध्ये निर्यातबंदी शिथिल करत चाळीस टक्के निर्यातशुल्क लागू करत नफ्याला खोडा घातला. १३ सप्टेंबर २०२४ रोजी निर्यातशुल्क वीस टक्क्यांवर आणले. कांदा लागवड वाढल्याचा आढावा घेऊन हेही शुल्क डिसेंबर-जानेवारीमध्येच हटविले असते तर कांद्याला उठाव मिळाला असता. मात्र आता परदेशातली मागणी घटली असून पाकिस्तानचा स्वस्त कांदा मिळू लागला आहे. कांद्याचे उत्पादन अठरा टक्क्यांनी वाढले आणि दुसरीकडे निर्यातीचे प्रमाण घटले असल्याने बाजारपेठेतला समतोल बिघडला आहे.

महाराष्ट्रासह गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश भागातून कांद्याला आवक चांगली आहे. त्यामुळे निर्यातशुल्क हटवूनही दरवाढ झाली नाही. भविष्याबाबत सध्या सांगणे अवघड आहे.
- बिपिन शहा, निर्यातदार

पीकविमा पारदर्शक करावा
कांदा उत्पादक बाळासाहेब गायकवाड व बापू जगताप म्हणाले, कांद्याला किमान पंचवीस ते तीस रुपये भाव मिळायला हवा. पंधरा रूपयांत भांडवल तरी निघेल का? भाव मिळू शकत नसेल तर सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. अशात नैसर्गिक आपत्तीने नुकसान होतेय. पीकविमा पारदर्शक करावा.

शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे म्हणाले, केंद्रसरकारने वेळोवेळी निर्णय घेऊन कांद्याचे भाव कसे वाढणार नाहीत याची काळजी घेतली आहे. आता शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावे.

लोणंद बाजार समितीतील कांद्याचे दर (प्रतिक्विंटल)
तारिक दर
६ मार्च ८०० ते २४००
१३ मार्च ८०० ते १६७०
२४ मार्च ८०० ते १७५०
२७ मार्च ५०० ते १६००
३ एप्रिल ७०० ते १६११

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.