इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामातील 11 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगला. या लढतीत कोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी पराभव केला. हैदराबादचा आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. तसेच यंदाच्या हंगामात हैदराबादला सलग तिसऱ्या पराभवाचाही सामना करावा लागला.
कोलकाताविरुद्ध हैदराबादची कामगिरी सुमार राहिली असली तरी श्रीलंकेचा अष्टपैलू कामिंडू मेंडिस याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आयपीएलमध्ये पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मेंडिसने आपल्या गोलंदाजीच्या अनोख्या शैलीने सर्वांना चकित केले. त्याने एकाच षटकामध्ये दोन्ही हातांनी गोलंदाजी करत कोलकाताच्या फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे त्याने फक्त गोलंदाजीच केली नाही तर एक विकेटही मिळवली.
ईडन गार्डन्सवर झालेल्या लढतीत हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकला आणि कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 12व्या षटकापर्यंत कोलकाताने 3 बाद 104 धावा केल्या होत्या. अंगक्रीश रघुवंशी 49 धावांवर खेळत होता, तर व्यंकटेश अय्यर नुकताच मैदानात आला होता. कमिन्सने याच संधीचा फायदा उठवण्याचे ठरवले आणि चेंडू कामिंडू मेंडिसच्या हाती सोपवला.
पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कामिंडू मेंडिस याने पहिल्याच षटकामध्ये दमदार कामगिरी केली. मेंडिसने पहिले तीन चेंडू डाव्या हाताने टाकले, तर पुढील तीन चेंडू उजव्या हाताने टाकले. उजव्या हाताने गोलंदाजी करताना त्याने चौथ्या चेंडूवर अर्धशतक झळकावणाऱ्या अंगक्रीश रघुवंशी याला हर्षल पटेल करवी झेलबाद केले. तसेच या षटकामध्ये त्याने फक्त 4 धावा दिल्या. पण यानंतर पॅट कमिन्सने त्याला पुन्हा गोलंदाजीची संधी दिली नाही. मेंडिसला हैदराबादने 75 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलेले आहे.
कोण आहे कामिंडू मेंडिस?
कामिंडू मेंडिस हा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. 2018 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या मेंडिसने श्रीलंकेकडून 12 कसोटी, 19 वन डे आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 5 शतक आणि 4 अर्धशतकांसह 1184, वन डेमध्ये 2 अर्धशतकांसह 353 आणि टी-20 मध्ये 2 अर्धशतकांसह 381 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याच्या नावावर कसोटीत 3, तर वन डे आणि टी-20 मध्ये प्रत्येकी 2 विकेट्सची नोंद आहे.