मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करांमुळे देशावर आर्थिक संकट आलेले असताना त्यापासून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी संसदेत ‘वक्फ’ विधेयकासाऱखे विषय काढले जात आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनींवर डोळा ठेवूनच हे विधेयक आणण्यात आले आहे,’’ अशी टीका शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. हे विधेयक मुस्लिम हिताचे असल्याचा भाजपचा दावा असेल तर त्यांनी हिंदुत्व सोडले आहे का, असा सवाल ठाकरे यांनी करत भाजप मुस्लिमांचे तुष्टीकरण करतोय का, असा सवाल केला.
शिवसेनेच्या (ठाकरे) खासदारांनी संसदेत वक्फ विधेयकाविरोधात मतदान केले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘विधेयकात काही सुधारणा चांगल्या आहेत, त्याला आमचा विरोध नाही. पण या विधेयकामुळे हिंदुत्वाबाबत भाजपची धरसोड वृत्ती आता हिंदूंना कळली आहे. खुद्द अमित शहा यांच्यासह भाजपच्या मित्रपक्षांनी विधेयकावर बोलताना जिनांनाही लाज वाटेल, अशा प्रकारे मुस्लिमांची बाजू घेतली. मुस्लिमांच्या हिताचे बिल आणले म्हणता, मग गरीब हिंदूंसाठी तुम्ही काय करणार? मग हिंदुत्व सोडले कोणी,’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
ते म्हणाले, की एखाद्या धार्मिक ठिकाणांच्या विश्वस्त मंडळावर गैरधर्मीय लादण्याचा अधिकार कोणी दिला? जर मंदिराच्या विश्वस्त मंडळावर गैरहिंदू लादला गेला तर ते सहन करता येईल का, असा सवाल करताना उद्या जैन, हिंदू, ख्रिश्चन धर्मियांच्या धार्मिकस्थळांबाबतही अशाच प्रकारची विधेयके आणली जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, की वक्फ बोर्डामध्ये अनियमितता असेल तर तर त्याला पायबंद घातलाच पाहिजे. पण काही बाबी उगाच उकरून काढल्या जात आहेत. देशाचा विकास, रोजगाराचे विषय बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम, हिंदूंत मराठी-अमराठी वाद निर्माण केले जात असतील तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजप जर हिंदुत्व हिंदुत्व करीत असेल तर त्यांनी आपल्या झेंड्यावरील हिरवा रंग काढावा. आमचा विधेयकापेक्षा भाजपच्या ढोंगाला आणि ‘वक्फ’च्या जमिनी बळकावून व्यापारी मित्रांना देण्याला विरोध आहे, असे ते म्हणाले.
तेव्हा शेपट्या कुठे गेल्या?हिंदुत्व सोडल्याच्या शिंदे गटाच्या आरोपालाही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. संसदेत शिंदे गटाचे खासदार असताना भाजप व मित्रपक्षांकडून मुस्लिमांची जी तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? हे लांगुलचालन सुरू असताना सत्तेतून बाहेर पडतो, असे का म्हणाला नाहीत?