डॉ. बालाजी तांबे
थंडी व शिशिर ऋतू हा सर्वांचाच अत्यंत प्रिय ऋतू. थंडीत मायेची, उबेची अधिक आवश्यकता असते. त्यामुळे थंडीत मायेच्या माणसांची अधिक आठवण येते.
केवळ उष्ण प्रदेशातील लोकांनाच नव्हे तर बर्फ पडणाऱ्या किंवा १२ महिने थंडी असणाऱ्या प्रदेशातील लोकांनाही उंच डोंगर व थंड वारे असलेल्या स्थळांचे आकर्षण असतेच. नवीन लग्नाचा आनंद व उत्साह जणू शरीरातील उष्णता वाढवत असावा. त्यामुळे लग्न झाल्या झाल्या लोकांना आठवण येते, थंड हवेच्या ठिकाणाची.
वातावरण दूषित झाल्याने, पर्यावरण असंतुलित झाल्यामुळे किंवा एकूणच विश्र्वाचे (ग्लोबल) तपमान वाढल्यामुळे सर्व जगभरच दिवसेंदिवस एकूण उन्हाळा वाढत आहे व त्याचबरोबर लोकांना थंडीची अधिकच आठवण येते आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गरम कपडे किंवा एखादे ब्लँकेट पुरते, पण गरमीपासून संरक्षण करण्यासाठी थंडीच्याच आश्रयाला जावे लागते. जगभर वाढलेले प्रदूषण व जगभर वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेमुळे वातावरणाचे एकूणच तापमान (ग्लोबल तापमान) वाढत आहे. त्यामुळे निसर्गाने बर्फरूपाने साठवून ठेवलेली व माणसाला हवीहवीशी वाटणारी थंडी, बर्फ वितळून गेल्यामुळे, कमी झाली आहे व त्यामुळे उन्हाळा अधिकच वाढला आहे. एकूणच या अग्नीपासून संरक्षण करण्यासाठी, शरीराची काळजी घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
एखाद्या माणसाला ताप आला की त्याच्या कपाळावर बर्फाच्या घड्या ठेवाव्या लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात पोहण्याच्या तलावात जाऊन डुंबणे, गार पाण्याच्या धबधब्याखाली किंवा नळाखली उभे राहण्याचा सुखदायक अनुभव सर्वांनाच आवडतो. दारे-खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून, वर पाणी छाटून घरातील उष्णता कमी करण्याचा प्रयोग पूर्वापार चालत आलेला आहे. सध्या हेच वाळ्याचे पडदे मशिनला गुंडाळून आत पंखा ठेवून कूलर तयार केला आहे. बरोबरीने आजकाल वातानुकूलित यंत्रांची चलती आहेच. दुपारच्या वेळेला जाड भिंती, उंच छत व खेळती हवा असणाऱ्या हॉलमध्ये जाऊन बसण्यातही थंड वातावरणाचा लाभ घेण्याचाच उद्देश असतो.
म्हणूनच, दुपारच्या वेळी, वातानुकूलित हॉलमध्ये किंवा उंच छताच्या व भरपूर मोकळी हवा असलेल्या मंदिरात ठेवलेले कार्यक्रम भरगच्च भरलेले असतात. बाहेरची थंडी जरी अशा तऱ्हेने अनुभवता येत असली तरी शरीरातली उष्णता कमी करणेही महत्त्वाचे असते. शरीरात वाढलेली उष्णता उन्हाळ्यातील उष्णतेमुळे अधिकच त्रासदायक ठरते. शरीरातील उष्णतेने नसा वाळणे, हाडांमधला रस व वंगण कमी होणे वगैरे त्रास होतात. एकूणच शरीरातला रस वाळतो व त्यामुळे जीवनातही ‘रस’ वाटेनासा होतो. म्हणून प्रत्येक जण धावतो थंडाईच्या मागे.
उन्हाळ्याच्या दिवसात, लिंबू, मीठ, साखर घालून तयार केलेले थंडगार सरबत, थंड ताक, थंड लस्सी, वाळ्याचे वा गुलाबाचे थंड सरबत किंवा प्रत्यक्ष थंडाई घेण्याकडे लोकांचा कल असतो. वाटलेले बदाम, साखर लावून तयार केलेले दूध थंडाईचा मुख्य भाग. काही प्रदेशात थंडाईत थोडी भांग मिसळण्याचा प्रघात आहे. धणे-जिऱ्याचे पाणी, लिंबाच्या रसाबरोबर उन्हाळीचे औषधही घेण्यानेही उन्हाळ्याच्या त्रासापासून सुटका करता येते. किसलेल्या बर्फाचा गोळा काडीला लावून, त्यावर सुगंधित साखरेचा पाक टाकून उन्हाळ्याच्या दिवसात खाण्याचा आनंद लहान मुले लुटतात. काही वेळेला असे बर्फ खाणे नडू शकते. पण बऱ्याच वेळा आइस्क्रीमपेक्षा हे बर्फाचे गोळे अधिक आनंद देतात. पण त्यासाठी वापरलेला बर्फ बनवताना वापरलेले पाणी स्वच्छ असावे.
यानंतर नंबर येतो आइस्क्रीमचा. दूध, मलई, साखर, घट्ट होण्यासाठी एखादा नैसर्गिक पदार्थ वापरून आइस्क्रीम तयार केलेले असावे. पण रासायनिक पदार्थ वापरून तयार केलेल्या आइस्क्रीमचा उपयोग थंडाई म्हणून केल्यास सर्व व्यवहारच थंड (ठप्प) होण्याचा त्रास होऊ शकतो.
शरीर आतून थंड ठेवण्यासाठी गुलकंद, मोरावळा, प्रवाळ, मोतीभस्म अशी अनेक औषधे आयुर्वेदाने सुचवलेली आहेत. भौतिक शरीर जरी थंडाईचा उपयोग करून उष्णतेपासून वाचवता आले, तरी स्वभाव थंड ठेवून मन शांत व थंड ठेवणे तितके सोपे नसते. एकूणच या सार्वत्रिक उष्णतेचा म्हणा किंवा कलियुगाचा परिणाम म्हणा, पण दिवसेंदिवस सर्वच माणसे गरम होत आहे. या गरमीचेही अनेक त्रास होतात. अलीकडे राग, मारामाऱ्या हे प्रकार तर बोकाळले आहेत; पण नैतिकमूल्यांच्या जपणुकीची, देशासाठी, स्वाभिमानासाठी कुणी पेटून उठले आहे असे मात्र दिसून येत नाही. एकंदरीत प्रत्येक व्यक्ती तापलेलीच असते. या उष्णतेवर उपाय भौतिक सुखाच्या मागे न लागता योगाभ्यास, ध्यान-धारणा, संगीत अशा मार्गांनी मन शांत ठेवण्याने करता येतो. भौतिक शरीराची थंडाई मनुष्य अनेक उपायांनी अनुभवू शकतो परंतु मानसिक थंडाई कशाने मिळेल हे जरी समजले असले तरी अनुभवात उतरविणे अवघड ठरले आहे.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)