IPL 2025: शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का, दिग्गज गोलंदाज स्पर्धा सोडून अचानक परतला घरी
esakal April 04, 2025 11:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुभमन गिलच्या नेतृ्त्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आत्तापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्यांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, पण नंतर दोन्ही सामने जिंकत त्यांनी दमदार पुनरागमन केले.

दरम्यान, संघ आता चांगल्या स्थितीत असतानाच त्यांना एक मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेला कागिसो रबाडा अचानक घरी परतला आहे.

स्पर्धा सुरू असतानाच वैयक्तिक कारणाने घरी परतला आहे. तथापि, त्याचे वैयक्तिक कारण नेमकं काय आहे, याबद्दल संघाकडून सांगण्यात आलेलं नाही.

दिलेल्या माहितीनुसार तो महत्त्वाच्या वैयक्तिक प्रकरणाचा सामना करत आहे. दरम्यान, तो आता परत कधी येणार आहे, याबद्दलही गुजरातने सांगितलेलं नाही. पण त्यांना तो लवकर संघासाठी उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा असेल.

रबाडा गुजरातसाठी पहिल्या दोन्ही सामन्यात खेळला आहे. पंजाब किंग्सविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने ४१ धावा खर्च करत एक विकेट घेतली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्या सामन्यात त्याने ४२ धावा देत एक विकेट घेतली होती. पंजाबविरुद्ध गुजरातला पराभव स्वीकारावा लागलेला, पण मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरातने दणदणीत विजय मिळवला होता.

गुजरातने तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध जिंकला. पण या सामन्यात रबाडा खेळला नव्हता. त्याच्या न खेळण्याचं कारणही शुभमन गिलने नाणेफेकीवेळी वैयक्तिक असल्याचे सांगितले होते. त्याच्या जागेवर गुजरातने अर्शद खानला संघात संधी दिली होती, ज्याने विराट कोहलीची विकेट घेतली.

दरम्यान, गुजरातकडे सध्या ग्लेन फिलिप्सच्या रुपात एक पर्याय आहे, ज्याला परदेशी खेळाडू म्हणून रबाडाच्या जागेवर खेळवले जाऊ शकते. याशिवाय गेराल्ड कोएत्झी देखील आहे, पण अद्याप तो पूर्ण फिट नसल्याची शक्यता आहे. फिलिप्स आणि कोएत्झी अद्याप आयपीएल २०२५ मध्ये खेळलेले नाहीत.

गुजरात सध्या ४ पाँइंट्ससह आयपीएलच्या पाँइट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा आयपीएलच्या १८ व्या हंगामातील चौथा सामन ६ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ६ एप्रिलला हैदराबादमध्ये खेळायचा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.