फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत जॉस बटलरच्या नेतृत्वात खेळलेल्या इंग्लंड संघाची अत्यंत खराब कामगिरी झाली होती. त्या कामगिरीनंतर बटलरने इंग्लंडच्या वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
त्यामुळे इंग्लंडच्या वनडे आणि टी२० संघासाठी कर्णधारपदाची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा आहे, अशात दोन नावे चर्चेत आहेत.
टेलिग्राफने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार युवा फलंदाज हॅरी ब्रुक इंग्लंडचा टी२० कर्णधार बनण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्याची या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी विचार करत असल्याचे समजत आहे.
ब्रुक इंग्लंडचा तिन्ही क्रिकेट प्रकारातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तो गेल्या काही वर्षापासून प्रमुख फलंदाज ठरला आहे. तथापि, ब्रुक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याआधी झालेल्या भारत दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेत फारशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता.
पण एकूणच त्याची गेल्या काही काळातील कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे तो इंग्लंडच्या टी२० संघाचे कर्णधारपद मिळवण्यासाठी आघाडीवर आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ब्रुकने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलमधून अचानक माघार घेतली आहे. पण आयपीएल २०२५ आधी याबाबत बीसीसीआयने नियम बदलले आहेत. बीसीसीआयच्या नियमानुसार कोणताही खेळाडू लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूने हंगाम सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली, तर त्याच्यावर २ वर्षांची बंदी लागेल.
या नियमानुसार पुढील दोन वर्षे ब्रुकवर आयपीएलमध्ये बंदी असणार आहे. त्याला आयपीएल २०२५ लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला ६.५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण त्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली.
ब्रुकने आत्तापर्यंत इंग्लंडसाठी २४ कसोटी, २६ वनडे आणि ४४ टी२० सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५०० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
वनडे कर्णधारपदासाठी दिग्गजाचे नाव चर्चेतइंग्लंडच्या टी२० कर्णधारपदासाठी ब्रुकचे नाव चर्चत असले, तरी वनडेसाठी दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्सचे नाव चर्चेत आहे. पण त्याच्या फिटनेसचाही विचार करावा लागणार आहे. सध्या तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत असल्याने क्रिकेटपासून दूर आहे.
तो इंग्लंडच्या कसोटी संघाचाही कर्णधार आहे आणि यावर्षात इंग्लंडला भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे या मालिकांचे महत्त्व लक्षात घेता आणि स्टोक्सचा फिटनेसचा विचार करून इंग्लंडला वनडे कर्णधारपदाबाबत विचार करावा लागेल.
तसेच २०२२ मध्ये वनडेतून निवृत्ती जाहीर केली होती, पण २०२३ वनडे वर्ल्ड कपपूर्वी त्याने निवृत्ती मागे घेतली होती. त्यामुळे तो या वर्ल्ड कपमध्ये खेळला. पण या वर्ल्ड कपनंतर अद्याप स्टोक्स इंग्लंडसाठी वनडे क्रिकेट खेळलेला नाही.
परंतु, हे देखील लक्षात घ्यावे लागणार आहे की ब्रेंडन मॅक्युलमने काही महिन्यांपूर्वीच इंग्लंडच्या वनडे आणि टी२० संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पण तो गेल्या काही वर्षांपासून इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक आहे आणि कसोटी कर्णधार स्टोक्ससोबत त्याचे बाँडिंग चांगले आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करता आता स्टोक्स वनडे संघाचा कर्णधार होणार का हे पाहावे लागेल.