कऱ्हाड : गोवंशीय जनावरांची अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार महेश बाबूराव शिंदे यांनी याबाबतची फिर्याद दिली असून, त्यावरून सत्यम जगन्नाथ चौगुले (वय २९, रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली), मारुती ज्ञानू सोपे (वय ५२), गणेश मारुती सोपे (वय २४, दोघेही रा. वाणी, चिंचाळे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
पोलिसांची माहिती अशी, कऱ्हाड-विटा मार्गावरून एका मालवाहतुकीच्या वाहनातून (एमएच १० सीआर ४३८१) जनावरांची वाहतूक केली जात होती. सौरभ अजित गाजी यांच्यासह त्यांचे सहकारी रूपेश विलासराव मुळे, चंद्रकांत गौतम गायकवाड, मंदार चव्हाण यांनी ते वाहन अडवून पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
हवालदार महेश शिंदे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन पाहिल्यावर संबंधित वाहनात जागा नसतानाही सहा गोवंशीय जनावरे दाटीवाटीने भरल्याचे आढळून आले. जनावरांसाठी चारापाण्याची कसलीही सोय केली नव्हती. जनावरांची बेकायदा आणि क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यात असलेल्या जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आली.