Marathi Entertainment News : मराठीबरोबरच हिंदी आणि साऊथमध्ये काम करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने आतापर्यंत विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. भूमिका लहान असो की मोठी ती समरसून साकारण्यामध्ये तिचा हातखंडा आहे. आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका तिने साकारल्या आहेत. विविध दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याबरोबर तिने काम केले आहे. आता तिचा ‘सुशीला सुजीत’ या मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. याबाबत तिच्याशी केलेली बातचीत...
आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटातील भूमिकेमध्ये नेमके तुम्हाला जाणवलेले वैशिष्ट्य कोणते?- या चित्रपटाचा महत्त्वाचा संदेश असा आहे, की आयुष्यात कुठलाही प्रश्न असेल तर तो बोलला पाहिजे म्हणजे तो कोणाबरोबरही असू शकतो. बहीण-भाऊ, नवरा-बायको, आपले सहकारी यांच्याशी आपलं काहीही बिनसलं असेल तर त्यांनी बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. आमचे लेखक व दिग्दर्शक हे सांगू बघतात, की घरातील स्त्री जर गप्प झाली तर गप्प होण्याचं कारण हे शोधलंच पाहिजे. ती जर गप्प झाली, तर पूर्ण घर हे मुकं होऊन जातं. त्यामुळे ती बोलती राहिली पाहिजे आणि आपला संवाद प्रवाही राहिला पाहिजे. मुख्य म्हणजे मला प्रसाद ओकबरोबर पुन्हा काम करायला मिळालं आणि स्वप्नील जोशीसोबत पहिल्यांदाच काम करायला मिळतंय याचा मला खूप आनंद झाला आहे.
प्रत्येक भूमिकेची कलाकाराला वेगळी तयारी करावी लागते. या चित्रपटातील भूमिकेसाठी तुम्हाला वेगळी तयारी करावी लागली का?- हो, निश्चितच! प्रत्येक भूमिकेसाठी विशिष्ट तयारी करावी लागते. ‘सुशीला सुजीत’साठी मला त्या व्यक्तिरेखेचा साधेपणा आणि तिच्या स्वभावातील बारकावे समजून घ्यावे लागले. या चित्रपटात संवाद सहजतेने आणि नैसर्गिकतेने मांडण्याची गरज होती. मला प्रसाद ओकच्या दिग्दर्शनाखाली काम करताना नेहमीच खूप शिकायला मिळते. या वेळीही तो प्रत्येक दृश्याच्या तयारीसाठी वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत होता, त्यामुळे भूमिकेचा अभ्यास करताना आणि ती साकारताना मला खूप आनंद झाला.
तुम्ही कोणतीही भूमिका अगदी सहज सुंदररीत्या साकारता. प्रत्येक भूमिकेच बेअरिंग तुम्ही छान पकडता, हे तुम्हाला कसं काय जमतं?- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या दिग्दर्शकांवर खूप अवलंबून असते. प्रत्येक दिग्दर्शकाकडून ती ती भूमिका समजून घ्यायला किंवा ती करायला मला फार आवडतं. मी असं म्हणते, की मी एक दिग्दर्शकाचं ऐकणारी चांगली अभिनेत्री आहे. खरं तर दिग्दर्शक कशा प्रकारे मला मार्गदर्शन करतात व तेथील माणसं व ते स्थान सगळ्या गोष्टी मला ऊर्जा देतात. हे सगळं महत्त्वाचं ठरते प्रत्येक पात्रासाठी.
चित्रपटसृष्टीत काम करत असताना कधी यश येतं तर कधी अपयश येतं. जेव्हा अपयश येतं तेव्हा ही इंडस्ट्री सोडून द्यावी, असा विचार कधी मनात आला आहे का?- नाही, कधीच नाही. कारण कलाकृतीला अपयश येणं ही माझी जबाबदारी मला वाटते आणि जबाबदारी झटकून कसं निघून जाता येईल. मला ही जबाबदारी घ्यावीशी वाटते व अजून चांगलं काम करावंसं वाटतं.
- अर्थातच केला जातो. कारण प्रत्येक चित्रपट सुरू करताना दिग्दर्शक कार्यशाळा घेतो. तसेच प्रत्येक कार्यशाळेत असं नसतं की प्रत्येक वेळी आपण दिग्दर्शकाला समजून घ्यावं कारण तिथे दिग्दर्शकदेखील शोध घेत असतो आपणही शोध घेत असतो ते खूप आवडतं मला. जर आपण शूटिंगच्या वेळी भेटलो तर त्यात चार दिवस हे तात्पर्य सांगण्यातच जातात. एक दिग्दर्शक म्हणून प्रसादला त्याच्या सर्व कलाकारांना एकत्र स्क्रिप्ट ऐकवायला खूप आवडते. प्रसादसोबत काम करणं ही एक धमाल असते, तो एक अभिनेता असल्यामुळे तो खूप काही छान सुचवतो. ‘कच्चा लिंबू’मध्ये त्याची वेगळीच पद्धत होती आणि ‘सुशीला सुजीत’मध्ये तो वेगळीच पद्धत हाताळत आहे. मला आशा आहे, की मला पुन्हा एकदा त्याच्या हाताखाली काम करायला मिळतंय.
‘सुशीला सुजीत’ या चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल?- सुशीला ही एक तरुण, मजेशीर आणि उत्साही स्वभावाची स्त्री आहे. अनोख्या परिस्थितीत अडकलेली असली, तरी तिचा दृष्टिकोन हलकाफुलका आणि गमतीशीर आहे. या प्रवासात तिच्यासोबत घडणाऱ्या अतरंगी घटना, मजेशीर गोंधळ आणि रंगतदार प्रसंग यामुळे प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन मिळेल. हा चित्रपट म्हणजे सुशीला आणि तिच्या अवतीभोवती घडणाऱ्या धमाल गोष्टींची मजेशीर सफर आहे. तूर्तास एवढंच सांगू शकते; पण प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच हसवेल आणि गुंतवून ठेवेल.