मुंबई : भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या खोऱ्यातील बंदीपोरा जिल्ह्यातील ‘आरागाम’ या गावात मराठीतील पुस्तकांचे गाव फुलणार आहे. मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्याच्या सरहद संस्थेच्या सहयोगाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. महाबळेश्वरजवळील ‘भिलार’ या पुस्तकाच्या गावानंतर राज्याबाहेर पहिल्यांदा ‘पुस्तकाचे गाव’ आकाराला येणार आहे.
काश्मीरमध्ये ‘पुस्तकाचे गाव’ विकसित करण्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासासाठी सामंत यांनी गुरुवारी (ता. ३) मुंबईत बैठक बोलावली होती. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आदी उपस्थित होते.
तत्कालीन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात महाबळेश्वरच्या भिलार येथे ४ मे २०१७ रोजी राज्यातील पहिले ‘पुस्तकाचे गाव’ योजना कार्यान्वित झाली. आता काश्मीरमध्येही मराठी पुस्तकांचे गाव फुलणार आहे.
काश्मिरातील आरागाम या पुस्तकाच्या गावाचे २ मेपर्यंत उद्घाटन केले जाणार आहे. त्यासाठी सरहद संस्थेकडून तयारी केली जात आहे.
अशी असेल रचना‘आरागाम’ या पुस्तकाच्या गावात १० दालने असतील. मराठी साहित्यातील विविध साहित्य प्रवाहांची ओळख त्यातून केली जाईल. तसेच मराठी भाषेतील कथा, कादंबरी, नाटक, बाल, महिला, ग्रामीण आदी साहित्यासह मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणारे विश्वकोश, साहित्य संस्कृती मंडळांची साहित्य संपदा येथे उपलब्ध केली जाणार आहे.