मुंबई : देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि चित्रपसृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या चित्रपटांची कथा सामाजिक विषय, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि राष्ट्रीय एकतेवर आधारित असत. या भारतभूमीच्या सुपुत्राला त्यांच्याबरोबर काम केलेल्या, त्यांना आदर्श मानलेल्या कलाकारांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
मातीतल्या सुपुत्राला, चित्रपटसृष्टीच्या अभिमानास, महाराष्ट्र आणि भारताच्या गौरवाला, खऱ्या अर्थाने ‘भारतरत्न’ ठरलेल्या आपल्या लाडक्या मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अनेक अजरामर चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका कायम आपल्या हृदयात घर करून राहतील. देशभक्ती त्यांच्या रक्तात होती आणि ती त्यांनी आपल्या अभिनयातून अप्रतिम पद्धतीने मांडली.
- शत्रुघ्न सिन्हा, अभिनेता
मनोजकुमार हे आता आपल्यात नाहीत, हे दुःख पचवणे कठीण आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबाला या कठीण काळात धैर्य मिळो, ही प्रार्थना.
- मौसमी चॅटर्जी, अभिनेत्री
मनोजकुमार यांनी आपल्याला अशी अनेक पात्र दिली, जी एकीकडे नायकासारखी होती आणि दुसरीकडे अगदी मानवी भावनांनी भरलेली होती. त्यांच्या चित्रपटांतून देशप्रेम आणि माणसांवरील प्रेम यांचा अतिशय हृदयस्पर्शी प्रत्यय येत असे. चित्रपटसृष्टीसाठी हे एक भरून न येणारे नुकसान आहे. खरेच एका युगाचा अंत झाला आहे.
- सनी देओल, अभिनेता
मनोजकुमार यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भक्कम आधारस्तंभ हरपला आहे. त्यांच्या कलाकृतींमधून ज्या प्रकारे भारताचा आत्मा साकार झाला. असा अभिव्यक्तीचा अद्वितीय नमुना दुर्मिळच.
- मनोज वाजपेयी, अभिनेता
मनोजकुमार यांचे चित्रपट हे फक्त करमणुकीसाठी नव्हते, तर ते मनाला भिडणारे होते. ते चित्रपट पाहून देशप्रेम, माणुसकी आणि जीवनाच्या मूल्यांची जाणीव व्हायची. ‘क्रांती’, ‘पत्थर के सनम,’ ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’ हे त्यातील काही लक्षात राहणारे चित्रपट. मनोज सर तुम्ही कायम लक्षात राहाल.
- काजोल, अभिनेत्री
मनोजकुमार यांनी असे चित्रपट निर्माण केले जे देशाची, चित्रपटसृष्टीची आणि एकतेची भावना उंचावणारे होते. ती भावना त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे मांडली. ते खऱ्या अर्थाने एक दिग्गज होते. त्यांच्या चित्रपटांनी एक अख्खं युग घडवले आणि आपल्या चित्रपटावर कायमचा ठसा उमटवला. आपण आमच्यासाठी नेहमीच ‘भारत’ राहाल.
- शाहरुख खान, अभिनेता
मनोजकुमारजी, तुम्ही एक खऱ्या अर्थाने दिग्गज होता आणि राहाल. अविस्मरणीय चित्रपट आणि आठवणींमुळे आपले ऋणानुबंध कायम राहतील.
- सलमान खान, अभिनेता
मनोजकुमार हे अखंड भारतात जन्माला आले. फाळणीवेळी त्यांचे कुटुंब भारतात परतले आणि दिल्लीजवळ स्थायिक झाले. मात्र पाकिस्तानमधील जन्मगावाच्या आठवणी त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या होत्या. त्यांनी ते कायम हळवे होत असत.
-मंजिरी चतुर्वेदी-वानखेडे, वरिष्ठ पत्रकार