मुंबई : भाजपाचे शीर्षस्थ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज आजपासून (11 एप्रिल) दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री पुण्यातील मुक्कामानंतर शनिवारी (12 एप्रिल) ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर अमित शहा मुंबईत आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दरम्यान, शहा हे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार असून या चर्चेत रायगड, नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवला जाण्याची शक्यता आहे. (Raigad guardian ministership dispute will be resolved during Amit Shah’s Maharashtra visit)
अमित शहा शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतील. नंतर 11 वाजता ते रायगड किल्ल्याला भेट देतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते वंदन करतील. नंतर किल्ल्यावर त्यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट देणार आहेत. दुपारचे जेवण ते तटकरेंच्या घरीच करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता शहा यांचे मुंबईत आगमन होईल. मुंबईत साप्ताहिक चित्रलेखाच्या विलेपार्ले येथील कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असणार आहे. रात्री ते सहयाद्री अतिथीगृह येथे येणार आहेत.
हेही वाचा – Tahawwur Rana : तहव्वुर राणा अखेर भारताच्या ताब्यात; काय कारवाई होणार?
दरम्यान, महायुतीत नाशिक, रायगड पालकमंत्रिपदासह शासकीय महांडळांच्या वाटपावरून वाद आहे. याबाबत शहा हे भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पालकमंत्री तसेच सरकारी महामंडळाच्या वादावर तोडगा काढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे अमित शाह हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सुनील तटकरे यांच्या घरी दुपारचं जेवण करणार आहेत. त्यामुळे सुनील तटकरे आपल्या लेकीच्या पालकमंत्रीपदासाठी अमित शहा यांच्याकडे शब्द टाकणार का? किंवा सुनील तटकरे यांनी पालकमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडल्यावर अमित शाह हिरवा कंदील दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद हा अमित शहांपर्यंत जाणार नाही, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. तर ही कोणतीही राजकीय भेट नसल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.