Gosht Ithe Sampat Nahi Shivcharitra Event : उलगडली अफजलखान वधाची शौर्यगाथा
esakal April 06, 2025 05:45 AM

पुणे - एकीकडे स्वराज्य नुकतेच आकारास येत असलेले, दिमतीला केवळ १० हजारांचे सैन्य आणि दुसरीकडे आदिलशाहीचा सरदार अफजलखान अन् त्याच्यासोबत असलेले बलाढ्य सैन्य... संख्येच्या दृष्टीने एकतर्फी असलेली ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी अफाट बुद्धिचातुर्याने जिंकली आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी रचला महापराक्रमाचा इतिहास, तो म्हणजे ‘अफजलखान वध’.

केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातील अतुल्य आणि अद्भुत शौर्यगाथा असलेल्या या लढाईचा पट सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांनी शनिवारी उलगडला. निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘गोष्ट इथे संपत नाही- शिवचरित्र’ या कार्यक्रमाचे.

या कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आठ महत्त्वाच्या अध्यायांवरील प्रयोग ५ ते २७ एप्रिल या कालावधीत प्रत्येक शनिवार-रविवारी सकाळी ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहेत.

शनिवारी ‘अफजलखान वध’ या प्रयोगाने या कार्यक्रमाची नांदी झाली. याप्रसंगी रांका ज्वेलर्सचे श्रेयस रांका, मानव रांका, विवान रांका, रावेतकर ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर, ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन झगडे, ‘द नेचर- मुकाईवाडी’चे चेअरमन सुशीलकुमार देशमुख, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रांका ज्वेलर्स असून सहप्रायोजक ‘रावेतकर ग्रुप’ आहेत. ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे ‘फायनान्स पार्टनर’ असून ‘द नेचर- मुकाईवाडी’, व्हीटीपी रिॲलिटी आणि ‘शिवसृष्टी थीम पार्क’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.

रविवारी (ता. ६) सकाळी ९.३० वाजता ‘पन्हाळा ते पावनखिंड’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची तिकिटे ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर सुरू असून नाट्यगृहावर देखील तिकिटे उपलब्ध आहेत.

उपक्रमाचे वेळापत्रक....

शनिवार (ता. १२)- ‘पुरंदरचा तह’

रविवार (ता. १३)- ‘आग्य्राहून सुटका’

शनिवार (ता. १९)- ‘मोहीम मांडली मोठी’

रविवार (ता. २०)- ‘शिवराज्याभिषेक’

शनिवार (ता. २६)- ‘दक्षिण दिग्विजय’

रविवार (ता. २७)- ‘लढाई मराठी अस्तित्वाची’

(सर्व कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.