- डॉ. सदानंद देशमुख, saptrang@esakal.com
सन १९५० ते १९६० च्या काळात ग्रामीण भागात ज्यांचा जन्म झाला, त्या पिढीने गावगाड्याच्या बदलाचा संपूर्ण काळ अनुभवला. त्यामुळे ही पिढी गावगाड्यातील बदलाची साक्षीदार आहे असं म्हणता येईल. नाही म्हटले, तरी स्वातंत्र्यपूर्व काळात खेडेपाडे एका स्थितीशील अवस्थेत होते. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र समाजाच्या एकूण सर्वच क्षेत्रात बदल झालेले दिसून येतात.
शेती, व्यापार, शिक्षण, नव्याने निर्माण झालेल्या सरकारी नोकऱ्यांमधील जागा त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात बरीच उलथा-पालथ झाली. शेता-रानातील मातीची उलथापालथ झाली की, तिची सुपीकता वाढते. त्यासाठी शेताची नांगरणी करून खालची माती वर आणि वरची माती खाली करावी लागते.
जो शेतकरी उन्हाळ्यात शेताची नांगरणी करत नाही त्याची अवस्था ‘वखरा- वखरी’ आणि ‘भेंडी- भाकरी’ अशी होते. म्हणजे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत हंगामातील त्याच्या उत्पन्नाची अर्ध्याने घट झालेली दिसून येते. तोच नियम कुटुंबाला, पर्यायाने एकूण समाजव्यवस्थेला लागू पडतो. कारण समाजव्यवस्थेच्या वर्तुळाचे पहिले आणि शेवटचे टोक हे कुटुंबच असते.
इंग्रजी कालखंडात एका विशिष्ट वर्गाला खूश ठेवण्यासाठी इंग्रजांनी वतनदारी आणि सरंजामी पद्धत सुरू केली. संस्थाने खालसा झाली, तरी गावातील वतनदार पाटील, कुलकर्णी, देशमुख यांच्याकडे हजारो एकर जमिनी होत्या. त्यामुळे या श्रीमंतांच्या जमिनीवर कुळे म्हणून गावातील इतर लोक राबायचे. त्यातूनच बसून खाणारा आणि राबून खाणारा असे दोन वर्ग ग्रामीण भागात होते.
त्यातूनच शेतीपोसे आणि शेतीकसे अशी वर्गवारी ग्रामीण समाजात झालेली होती. ज्यांच्या मालकीची शेकडो एकर जमीन होती ते केवळ आरामात बसून खायचे. वडिलोपार्जित शेतीच्या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब पोसले जायचे. ते इतर कष्टकरी समाजाला राबवून घ्यायचे. शेतीत श्रम करणारा कष्टकरी वर्ग शेती कसून स्वतः जगायचा, कुटुंब जगवायचा आणि इतरांनाही अन्नधान्याची उपलब्धी करून द्यायचा.
त्याची बायको, मुलेही त्याच्यासोबत राबायची. श्रीमंत जमीनदारांच्या सोबत त्याची बालका- मुलेही बसून खायची. मालक म्हणून मिरवायची. प्रसंगी राबणाऱ्या वर्गावर अन्याय- अत्याचार करायची. याच्या अनेक कथा त्या काळातल्या आहेत. थोडक्यात म्हणजे, ग्रामीण व्यवस्थेच्या या स्थितीशील अवस्थेत गावगाड्यातील जनजीवन, समाजरचना ही स्थितीशील होती. क्वचित प्रसंगीच या जीवनात बदलाचे तरंग उठायचे.
बलुतेदारीच्या पद्धतीने ही समाजरचना पारंपरिक, स्थितीशील अवस्थेत मार्गक्रमण करायची. ‘कालचा दिवस’ तसाच ‘आजचा दिवस’ उगवायचा. आजचा तसाच उद्याचाही दिवस ठरलेला असायचा. एका बंदिस्त अशा स्वरूपातील हे जीवन असल्यामुळे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक पर्यायाने मानसिक, बौद्धिक या पातळ्यांवर एक कुंठित अवस्था निर्माण झालेली असायची.
ग्रामीण भागातील उलथा-पालथ व्हायला खऱ्या अर्थाने सुरवात झाली ती स्वातंत्र्योत्तर काळात. वेगवेगळ्या कारणांनी जमिनीचे विकेंद्रीकरण सुरू झाले. जमीनधारणा कायदा, भूदान चळवळी, नव्याने व्यापाराच्या व व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण झालेली अर्थप्राप्तीच्या नव्या जागा, शहरी भागात आलेले औद्योगीकरण, कामगारवर्गाचा उदय. याचा नाही म्हटले, तरी ग्रामीण भागावर प्रभाव पडलाच.
ग्रामीण भागातील मजूर वर्ग, शहराकडे वळू लागला. त्यातूनच वतनदारीला आणि बलुतेदारीला हादरे बसू लागले. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू लागले. त्यातून नव्याने सन्माननीय अशी अर्थप्राप्ती होऊ लागली. जीवनमान उंचावले जावू लागले.
सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे त्रस्त घायाळ झालेल्या गरिबांच्या जीवनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक, बौद्धिक, सामाजिक पातळ्यांवर जे परिवर्तन झाले. त्यातूनच नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढला आणि ग्रामीण भागातील बदलाला सुरवात झाली. असा या बदलाचा वरीलप्रमाणे केवळ धावता आढावा घेता येईल.
पारंपरिक पीकपद्धतीत आधुनिक शेतीमध्ये संकरित वाणाचा प्रवेश झाला, त्या प्रमाणेच खेड्यापाड्यातून जे सांस्कृतिक बदल झाले त्याचाही थोडक्यात आढावा घेता येईल. कारण आर्थिक आणि सामाजिक वातावरणाप्रमाणेच सांस्कृतिक मूल्यांनीसुद्धा गावगाड्यातील समाजजीवन वेधलेले आणि वेढलेले असते असे दिसून येईल.
पूर्वी गाव- खेडे शारीरिक आणि मानसिक भरण-पोषणाच्या दृष्टीने स्वयंभू होते. खायला-प्यायला जे काही अन्नधान्य आणि दूधदुभते, भाजीपाला इ. लागायचा त्याचे उत्पादन आणि निर्मिती गावातच व्हायची. शेतात ज्वारी, तूर, कपाशी इ. पिकांसोबत कठाण-कुठाण म्हणून अठरा पगड धान्यातील एक प्रकार होता. त्यात तीळ, बरबटी-चवळी, कराळ अशी वाणं असायची.
साठपासून ऐंशीपर्यंतच्या दोन दशकात ज्वारीबरोबरच मुगाचे मुख्य पीक असायचे. ज्वारी ही आधी गावरान ज्वारी म्हणून ओळखली जायची. त्यात डुकरी, खोंडी असे अनेक प्रकार असायचे. खरिपाचे पीक म्हणून हे ज्वारीचे पीक असायचे. त्यातच आंतरपीक म्हणून एक किंवा दोन ओळीत तूर पेरली जायची. पाच तासे किंवा सहा तासे म्हणजे दोन तिफणी ज्वारी पेरली जायची.
उगवताना मग बरोबर पाच तासानंतर एक तास तुरीचे यायचे. पिकाची जी ओळ म्हणजेच रांग उगवून यायची तिला ‘तास’ असे म्हटले जायचे. म्हणूनच बोलताना ‘आमची पेरणी झाली.. आता पीक तासी लागले...’ ‘तासातलं तण निंदताना सगळं खुरपून घ्या..’ असा ‘तास’ हा शब्द मध्यवर्ती ठेवून बोलायची पद्धत होती.
मुगाचे खरीपाचे मुख्य पीक दसऱ्याच्या दरम्यान निघायचे. त्यानंतर त्याच शेतात रब्बीचे ‘करडी’ हे पीक पेरले जायचे. दहा-दहा, वीस-वीस एकराचे नंबर (म्हणजे शेतं) या पिकांनी भरगच्च असे भरलेले असायचे. त्यानंतर संकरित वाणांचा जेव्हा शेतारानात प्रवेश झाला तेव्हा हळूहळू ‘मूग’ आणि करडीचे पीक शेताशिवारातून हद्दपार झाले.
कारण खरिपात पेरल्या जाणाऱ्या मूग पिकावर कोकडा, हळद्या अशा रोगांचे आक्रमण झाले. त्यामुळे नंबरच्या नंबर शेतकऱ्याच्या अंगावर पडू लागले, तर करडीसारख्या पिकांवरसुद्धा ‘होपारा’ जाऊ लागला. म्हणजे करडीच्या बोंडात दाणे भरेनासे झाले. अशी लागोपाठ एक दोन वर्षे नापिकीची गेल्यानंतर गाव-शिवारात आपोआपच या पिकांची पेरणी बंद झाली.
अर्थात, नंतर ‘सोयाबीन’ हे पीक मुगाच्याऐवजी पर्यायी पीक म्हणून आले. ते अजून तरी सर्वत्र खरिपाचे मुख्य पीक म्हणून शेतकरी घेताना दिसतो. मूग आणि सोयाबीन हे एक उदाहरण झाले. अशाच प्रकारे पीकपद्धतीत अनेक प्रकारचे बदल झाले. जसे नवीन पीक आले तशीच त्यांची पेरणी, लावणीची आणि कापणीची पद्धतसुद्धा बदलत गेली.
मात्र, कोकणासारख्या प्रदेशात जे धान म्हणजे तांदुळाचे पीक आहे, त्यात वाण बदलले असले, तरी पीकपद्धती तीच पारंपरिक असल्याचे दिसून येते. इतर जो कोरडवाहू व कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू किंवा पावसावर अवलंबून असलेला जो प्रदेश आहे तेथील पीकपद्धतीमधील बदल हे गावगाड्यातील बदलाच्या कारणांपैकी एक कारण आहे असे दिसून येते.
पूर्वी बेलबारदाण्याच्या माध्यमातून शेती कसली जाई, तेव्हा एकाच शेतात अनेक प्रकारची मिश्र पीके घेण्याची पद्धत होती. कारण तेव्हाच्या औता-फाट्यासाठी ते शक्य होते. जमिनीच्या छोट्या-छोट्या तुकड्यात नांगरा-वखराच्या माध्यमातून अशी विविध पीके एकाच शेतात घेणे शक्य होते.
मात्र, नंतरच्या काळात शेती- शिवारात यांत्रिकीकरणाने प्रवेश केला. कुणबिकीतला बैलबारदाणा आणि पशुधन त्यामुळे आपोआपच कमी झाले. सगळी पिके ट्रॅक्टरवर पेरणीयंत्राद्वारे पेरली जाऊ लागली. कापणीही हार्वेस्टरच्या माध्यमातून केली जाऊ लागली.
या पेरणी-कापणीच्या सलग सोयीसाठी शेताच्या मोठ्या भागावर सलग एकवर्णी, एकच पीक पेरले जाऊ लागले. अशी ही पीक पद्धतीतील लावणी, पेरणी, कापणीची पद्धतसुद्धा ग्रामीण भागातील एकूणच कृषीक्षेत्राच्या संदर्भात उलथा-पालथ घडवून आणणारी ठरली असे दिसून येईल.