शैलेश नागवेकर - jayendra.londhe@esakal.com
२ एप्रिल २०११. साधारणतः रात्री ११ची वेळ... सर्वांनी श्वास रोखून धरलेला असताना... ‘धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाइल’ रवी शास्त्री यांच्या या वक्तव्याने प्रत्येक भारतीयांचा ऊर भरून आला होता. आसमंत दणाणला होता. वानखेडे स्टेडियमवर इतिहास घडला होता. महेंद्रसिंग धोनीने षटकार मारला आणि भारताने १९८३ नंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाचे ते श्रेय होते; पण रवी शास्त्री यांनी तो शब्दबद्ध केलेला क्षण अजूनही कानात गुंजतो, एवढी ताकद त्या एका वाक्यात होती. समोर मैदानावर कितीही थरार घडत असो; पण समालोचनातून तो तेवढ्याच रोमांचकपणे मांडण्यात आला तर त्या क्षणाची महती गगनाला भिडते... यातून समालोचन किती महत्त्वाचे असते हे स्पष्ट होते.
आता दुसरे उदाहरण पाहू या. आयपीएल सुरू आहे आणि सामने सुरू होऊन काही दिवसच झाले नाही तर एक सर्वसामान्य; परंतु क्रिकेटचा चाहता असलेल्या आणि गांभीर्याने सामने पाहणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्याने प्रामुख्याने हिंदी समालोचनाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. प्लीज... असा शब्द वापरून ही व्यक्ती तळमळीने बोलत आहे... क्रिकेटचे तांत्रिक ज्ञान देण्याऐवजी शेरोशायरी. जुने किस्से आणि कधी कधी अश्लील संदर्भ दिले जात आहेत. समालोचन करणारे तुम्ही सर्व जण महान खेळाडू आहात. तुम्हाला सर्व ज्ञान आहे.
तुम्ही आम्हाला तांत्रिक बाजू समजावून सांगितल्या नाहीत तर कोण सांगणार? काही प्रेक्षकांना कदाचित हे आवडत असेल... अधूनमधून असा विनोदीपणा ठीक आहे; परंतु प्रत्येक चेंडूनंतर शेरोशायरी होत असेल तर उबग येतो, आम्हाला मग नाईलाजाने इंग्रजी समालोचनाकडे वळण्याशिवाय पर्याय राहात नाही... असे कळकळीचे आर्जव ही व्यक्ती करताना दिसत आहे. पुढे म्हणतो... हे तुम्हाला ब्रॉडकास्टर करायला सांगतोय की क्रिएटरकडून संदेश दिले जात आहेत? पण जे समालोचन कानावर येते ते निश्चितच श्रवणीय नाही... या व्हिडिओला लाखांमध्ये व्हूज मिळाल्या आणि अनेकांनी जोरदार कमेंटही दिल्यात. प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि समालोचक असलेल्या हरभजन सिंगने ही ‘नोटेट’ अशी कमेंट देऊन दखल घेतलीय.
प्रामुख्याने क्रिकेट समालोचनाने व्याप्ती वाढवली आहे. इंग्रजी आणि हिंदीबाहेरही लोकल फ्लेव्हर मिळवण्यासाठी मराठीसह इतर भाषांमध्ये समालोचन केले जाते. त्यामुळे स्थानिक भाषांमधील आवाजांची संवादफेक, म्हणी, संदर्भ, शब्द यांचा समावेश होणे स्वाभाविक आहे. स्थानिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी हे सर्व प्रयोग केले जाणे अनिवार्यच; पण प्रामुख्याने आयपीएल ही सर्कस जरी असली तरी त्यात क्रिकेट खेळले जाते, संघर्ष केला जात असतो, त्या खेळाचे तांत्रिक ज्ञान सांगायलाच हवे.
आयपीएलमध्ये क्रिकेट हा खेळ मूलभूत असला तरी पैसा आणि प्रसिद्धी यामुळे त्याला वेगळे वलय अगदी सुरुवातीपासूनच मिळालेले आहे. २००८ मध्ये पहिल्या आयपीएलमध्ये स्टुडिओत अभिनेत्री मंदिरा बेदी अँकर किंवा समालोचक या भूमिकेत दिसली तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मंदिरा बेदी आणि क्रिकेट यांचा काय संबंध असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मंदिरा काय बोलते, यापेक्षा ती कशी दिसते हे पाहणारा हा वर्ग त्यावेळी टीव्हीसमोर असायचा... आता क्रिकेट खेळलेल्याच नव्हे तर वाक्चातुर्यात प्रवीण असलेल्या काही महिला सहजतेने आयपीएलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत समालोचन किंवा अँकर म्हणून दिसतात; पण त्या वेळी आयपीएलचे प्रक्षेपण वेगळ्या चॅनेलवर होते आता ते वेगळ्या चॅनेलवर आहे; मात्र २००८ पासून सुरू झालेला वेगळ्या धर्तीवरचा हिंदी समालोचनाचा प्रवास आता शेरोशायरीवर आला आहे.
आयपीएल पाहण्याचा काहींचा दृष्टिकोन कदाचित वेगळ्या आवडीचा असेल; पण नवोदित खेळाडू ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचे आहे त्यांचे विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा यांसारखे आयडॉल आहेत. त्यांच्या खेळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म समजावून सांगण्याचीही जबाबदारी समालोचक म्हणून नव्हे तर माजी खेळाडू म्हणूनही आहे... याचा विसर पडू नये, असेही त्या व्यक्तीला व्हिडिओतून सुचवायचे आहे.
डोळ्यात पाणी आणणारे समालोचनसमालोचक प्रभावी असतो. कधी कधी त्याच्याकडून व्यक्त होत असलेल्या शब्दांतून आणि व्यक्त होणाऱ्या भावभावनांतून दर्शकांचे डोळे पाणावतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुनील तनेजा यांनी रियो आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे पदक निश्चित होत असताना सामन्याच्या अखेरच्या क्षणी केलेले समालोचन. ‘भारताने हॉकी मेडल जीत लिया है... प्रभू!!’ कंठ दाटून आलेला असताना तनेजा यांचे हे वाक्य रवी शास्त्री यांच्या त्या वाक्याएवढेच किंबहुना ऐकणाऱ्याच्याही डोळ्यांत पाणी आणणारे होते.
एवढी ताकद शब्दांत असते, हे तनेजा यांनी दाखवून दिले होते. हे तनेजा काही माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू वगैरे नाहीत; पण ते सर्वच खेळांचे समालोचन करतात. अगदी प्रो कबड्डीचेही! कबड्डी हा खेळ तसा तांत्रिकदृष्ट्या समजावून सांगणे सोपे नाही. आता तर तो सर्वांना समजतो; पण सुरुवातीच्या काळात तनेजा यांनी ते शिवधनुष्य पेलले होते आणि लोकप्रियही केले होते. ऑलिंपिकमधील तिरंदाजी, बॉक्सिंगसह इतर खेळांचेही ते समालोचन करतात. असो, सांगायचा मुद्दा असा, की उथळपणा म्हणजे समालोचन नाही हे निश्चित.
शब्दांतून जाहिरात होते तेव्हा...हे युग कधीच आधुनिक झालेले आहे. आता तर ‘एआय’ने जाळे विणले आहे. मार्केटमध्ये कमालीची स्पर्धा वाढलेली असताना घडणाऱ्या प्रत्येक लोकप्रिय किंवा चर्चेत असलेल्या गोष्टींचा कसा फायदा घेतला जाईल, हे सांगता येत नाही. सध्या सुरू असलेला ‘जिबली’ हा त्यातलाच प्रकार; पण स्टूपीड या रागाने व्यक्त केलेल्या शब्दावर जाहिरात तयार केली जाऊ शकते, हे कल्पनेच्या पलीकडचे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रिषभ पंत जम बसलेला असताना चुकीचा फटका मारून बाद झाला आणि संघाचेही नुकसान झाले; पण त्या वेळी ऑस्ट्रेलिया रेडिओवर समालोचन करताना गावसकर यांनी, स्टूपीड... स्टूपीड.. स्टूपीड... असा शब्दप्रयोग केला होता.
फारच चर्चा झाली होती या शब्दांची; पण आता आयपीएलमध्ये एका जाहिरातीत तोच रिषभ पंत तेच स्टूपीड... स्टूपीड... स्टूपीड... असे शब्द उच्चारत आहे. समोर गावसकर दिसत आहेत आणि नंतर दोघे एकत्र येऊन फेर धरत आहेत. त्यामुळे एखाद्या प्रसंगाचा, शब्दाचा कधी, कसा आणि कोणत्याप्रकारे उपयोग केला जाईल हे विचार करण्याच्या पलीकडचे आहे. यावर एकच उपाय दिसतोय. नळी फुंकिली सोनारे... इकडून तिकडे गेले वारे... एका कानाने ऐकायचे दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे..!