इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने शनिवारी पंजाब किंग्सविरुद्ध मुल्लनपूरला झालेल्या सामन्यात ५० धावांनी विजय मिळवला. हा राजस्थान रॉयल्सचा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय ठरला.
तथापि, या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या एका कृतीची चर्चा झाली. नेहमी शांत असलेला सॅमसन या सामन्यात त्याच्या विकेटनंतर मात्र वैतागलेला दिसला.
या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला बोलावले होते. त्यामुळे राजस्थानकडून संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी सुरुवात चांगली केली होती. त्यांनी धावफलक हलता ठेवला होता.
खेळपट्टीवर स्थिरावल्यावर संजू सॅमसनने आक्रमक पवित्राही घेतला होता. त्यांनी १० षटकात एकही विकेट न गमावता मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.
मात्र, ११ व्या षटकात लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीचा सामना करताना बाद झाला. फर्ग्युसनने टाकलेल्या या षटकाच्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शॉट खेळताना सॅमसन चुकला.
त्याने फर्ग्युसनने टाकलेल्या ताशी १४४.२ किमी वेगाच्या या चेंडूवर मारलेला शॉटने चेंडू थेट मिड-ऑफला असलेल्या श्रेयस अय्यरच्या हातात गेला. त्यामुळे सॅमसनला विकेट गमवावी लागली. त्यामुळे तो प्रचंड वैतागलेला दिसला. झेल गेल्याचे लक्षात येताच त्याने जोरात बॅट हवेत फेकली. त्याची बॅट हवेत फिरून खाली जमिनीवर पडली.
त्यानंतर सॅमसनने ती बॅट उचलली आणि तो निराश होत माघारी फिरला. सॅमसनने २६ चेंडूत ६ चौकारांसह ३८ धावा केल्या.
दरम्यान, तो बाद झाल्यानंतरही राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. जैस्वालने अर्धशतक करताना ६७ धावांची खेळी केली, तर रियान परागने नाबाद ४३ धावा केल्या.
तसेच शिमरॉन हेटमायर (२०) आणि ध्रुव जुरेल (१३*) यांनीही आक्रमक खेळ केला. त्यामुळे राजस्थानने २० षटकात ४ बाद २०५ धावा केल्या. ही मुल्लनपूरमधील आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
त्यानंतर २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला २० षटकात ९ बाद १५५ धावाच करता आल्या. पंजाब किंग्सकडून नेहल वढेराने ६२ धावांची खेळी केली, तर ग्लेन मॅक्सवेलने ३० धावा केल्या.
बाकी कोणालाही खास काही करता आले नाही. राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर संदीप शर्मा आणि महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
संजू सॅमसन यशस्वी कर्णधार
संजू सॅमनसनच्या नेतृत्वात मिळवलेला हा राजस्थान रॉयल्सचा ३२ वा विजय आहे. त्यामुळे तो राजस्थान रॉयल्सचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. त्याने शेन वॉर्नचा ३१ विजयांचा विक्रम मागे टाकला.