जीवनाची 'गझल' सांगणारा...
esakal April 06, 2025 11:45 AM

दिलीप कुंभोजकर - kumbhojkar.dilip@gmail.com

सुरेश भट हे नाव घेतले की सहज आठवतात ती ही गाणी...

‘‘तरूण आहे रात्र अजुनी...’’ ‘‘ केंव्हातरी पहाटे उलटून रात गेली...’’ ‘‘ मलमली तारूण्य माझे...तू पहाटे पांघरावे...’’

‘‘मेंदीच्या पानावर...’’ ‘‘उषःकाल होता होता...’’ ‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! ’’

सुरेश भट हे नुसते एक सुप्रसिद्ध कवी होते असे नाही तर ते मराठी भाषेत ‘गझल’ हा काव्यप्रकार रुजविणारे ''शायर'' होते. खऱ्या अर्थाने ते मराठीतील ''गझल सम्राट'' आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना ते अडीच वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांच्या शारिरीक हालचालींवर मर्यादा होत्या पण त्यांची काव्य प्रतिभा सर्व मर्यादा ओलांडून मराठी सारस्वताची पूजा बांधायची. त्यांनी प्रेमगीत लिहीली, स्फूर्तीगीत लिहीली पण ते लोकप्रिय झाले ते ‘गझल’मुळे. सुरेश भट यांच्या कवितांची एक वही पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हाती पडली, त्यांनी सुरेश भट यांना त्वरित संपर्क साधला आणि मग एक एक कविता लतादीदी आणि आशाताई यांच्या आवाजात मराठी मनावर राज्य करू लागल्या आणि सुरेश भट हे महाराष्ट्राचे लाडके कवी बनले.

गझलमध्ये साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवी म्हणजे दोन ओळींचा एक शेर असतो. केवळ दोनच ओळीत नाट्यमय रचना करावयाची असते. त्यासाठी शब्दसंख्या मात्र मर्यादित असते. प्राचीन इराणमधील (पर्शियामधील) या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांच्यामुळे रुजला. ईश्वर-भक्ताचे नाते प्रियकर-प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेत स्पष्ट करणाऱ्या या संतांनी आपली प्रार्थनागीते गझल या काव्यप्रकारात रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचा उपयोग केला. देशात अमिर खुस्रो, गालिब यांच्या गझला प्रसिद्ध आहेत. मराठीत माधव ज्युलियन यांनी पण गझल हा काव्यप्रकार हाताळला पण न्याय दिला तो सुरेश भट यांनी. त्यानंतर प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी गझल चळवळीत मोलाची भर घातलेली आहे. गझल विषयक माझ्या वाचनात एक मजेशीर गोष्ट आली आहे ती अशी -

‘‘ एका जंगलात एक काळवीट गवत चरत होता. तो एका शिका-याच्या नजरेस पडला. शिकारी धनुष्यबाण सावरीत हळुच काळवीटाकडे जाऊ लागला. पण पाला-पाचोळ्याच्या आवाजाने काळवीट जागा झाला आणि वेडेवाकडे पळू लागला. बाणाचा नेम चुकविण्यासाठी जनावर नेहमी वेडेवाकडे पळते. शिकारी मागे धावू लागला.... पण काळवीट त्याच्या दुर्दैवाने एका वटवृक्षाच्या पारंब्यात शिंग अडकल्याने थांबला. त्याने आता सर्व संपले असा विचार करीत मागे वळून शिका-याकडे पाहिले तेंव्हा काळविटाच्या डोळ्यात शिकाऱ्याला जे भाव दिसले त्याला ‘गझल’ असे म्हणतात. गझल ही ब-याच वेळा दु:खी कविता असते, हृदयात टोचणारी, डोळ्यात अश्रू तरळणारी असते. वेदनेच्या तीव्रतेवर भावनांचे उदात्तीकरण करताना ही काव्यनिर्मिती होते.

जगत मी आलो असा की,

मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की,

मग पुन्हा जुळलोच नाही॥

हा भावनांचा खेळ आहे, वेदनांचा मेळ आहे. व्यावहारिक जीवनात जगताना मनासारखे घडत असतेच असे नाही. संकल्प आणि सिध्दी, प्रयत्न आणि यश, आशा आणि अपेक्षा यांचे गणित सोडवताना तथाकथित समजूतदारपणा दाखविणे जरुरीचे असते. हा समजूतदारपणा मनाला मान्य असतोच असे नाही. अखेर कवी मन मोकळे करताना सहज कबूल करतो ... मी असा जगत आलो पण मी रमलो नाही. वेळप्रसंगी आतूनच तुटलो, अंत:करणापासून स्वतःवर नाराज झालो जी नाराजी मला दूर करताच आली नाही.

जन्मभर अश्रूंस माझ्या,

शिकविले नाना बहाणे

सोंग पण फसव्या जिण्याचे,

शेवटी शिकलोच नाही ॥१॥

हा भावनेचा उत्कट अविष्कार आहे. हा मानसिक हळवेपणा आहे. बलदंड शरीरातही मनाचे हिंदोळे झुलत असतात. ‘जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे’ , हा संस्काराचा परिणाम आहे. डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या दोन थेंबामागे, अश्रूंमागे बरेच काही साचलेले असते. हे अश्रू लपवित चेहऱ्यावर हास्य दाखवू शकलो नाही. हे कवीचे शल्य चेहऱ्यावरील हास्यात दिसत नाही पण वास्तव आहे.

कैकदा कैफात माझ्या मी

विजांचे घोट प्यालो

पण प्रकाशाला तरीही हाय,

मी पटलोच नाही ॥२॥

‘प्रेम आणि मरण’ ही गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांची गाजलेली कविता आहे. एका मोकळ्या मैदानात एक छान, डेरेदार वृक्ष दिमाखात उभा असतो. आकाशातील चमकणारी वीज पाहून तो तिच्या प्रेमात पडतो... वीजे साठी झुरायला लागतो, सर्व जण समजवतात पण... ‘‘इष्काचा जहरी प्याला नशिबाच्या ज्याच्या आला हा असा’’॥

या ठिकाणी हाच विचार कवी सुरेश भट दोन ओळींत मांडतात. विजांचे घोट प्यालो पण प्रकाशाला मी पटलोच नाही. पावसात भिजून सुध्दा मन कोरडेच राहिले, जीवापाड प्रेम करून समोरची व्यक्ती शुष्कच राहीली तर काय करावे?

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके...

सांभाळले मी

एकदा हसलो जरासा,

मग पुन्हा हसलोच नाही ॥३॥

हे निराशेचे शब्द आहेत. आनंदी राहण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी मी सर्व काही स्वीकारले होते जे पटलेच नव्हते. वेड्या आशेसाठी मी स्वतःला सावरीत समाधानाचे, ‘हास्याचे हुंदके’ चेहऱ्यावर सांभाळले होते. खरंतर ‘हास्याचे हुंदके’ हा विरोधाभास आहे. हास्य हे आनंदाचे प्रतिक आहे तर हुंदका हा वेदनेचा अविष्कार आहे. ‘एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही’ ! हा हुंदकाच आहे.

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे

एवढे स्मरते मला की,

मी मला स्मरलोच नाही ॥४॥

बऱ्याच वेळा आपण आपले जीवन जगत असतो पण त्या जगण्यात आपणच नसतो. ही एक शोकांतिकाच आहे. आपण आपल्यालाच न्याय देऊ शकत नाही. आमची प्रौढ नागरिकांची एक पिढी आहे, जी आईवडील यांचे ऐकत मोठी झाली आणि आता मुलांचे ऐकत आयुष्याचा सायंकाळ मोजीत आहे. आता व्यथांचेच रान इतके माजले आहे ज्यात व्यथा टोचत नाहीत आणि जाणिव जाणवतही नाही. सुप्तमनातील दुःख कवीने छान शब्दबद्ध केली आहेत जी हृदयस्थ होऊन स्थिर झाली आहेत, जी आता स्मरण्यातही अर्थ नाही.

वाटले मज गुणगुणावे,

ओठ पण झाले तिऱ्हाइत

सुचत गेली रोज गीते;

मी मला सुचलीच नाही ॥५॥

काही जखमा अशाच असतात की ज्या भरून येतात पण व्रण तसाच राहतो. मनात अनेक विचार असतात पण तसे वागता येत नाही, संकोच आड येतो. एखादी गाढ मैत्री प्रसंगाने तुटते पण कालांतराने त्या प्रसंगाचे महत्व कमी होते पण परत जवळ येताना मानसिक संकोच आड येतो. मनात अनेक शंका येतात. आपले स्वागत होईल का ? मनातला विचार बरोबर आहे का ? मग कवी म्हणतो,

‘‘वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत’’. मन शंकांनी भरून गेले, मनातील शब्द ओठावर येईनात आणि आले जे शब्द त्यात मी नव्हतो म्हणजेच ते मनातले शब्द नव्हते. चेहरा आणि मुखवटा यातील हा फरक आहे.

संपल्यावर खेळ माझ्या

आंधळ्या कोशिंबिरीचा....

लोक मज दिसले अचानक;

मी कुठे दिसलोच नाही ॥६॥

आपण आपले जीवन आंधळी कोशिंबीर या खेळासारखे जगत असतो का? प्रारब्ध आणि नियती या डोळ्यावर बांधलेल्या पट्ट्या आहेत का? खेळ संपल्यावरच आपण डोळ्यावरील पट्टी काढतो. डोळे चोळत इकडे तिकडे पाहतो, इतरांना पाहतो पण स्वत:लाच विसरतो.

कवी सुरेश भट यांनी जीवनातील वास्तव दोन ओळींतून साकारले आहे. मी माझा असतो का? आई-बाबा, आजी-आजोबा, भाऊ-बहिण, मुलगा-मुलगी, सासू-सासरे, मित्र-मैत्रिणीं, बॉस-नोकर या नात्यांच्या जाळ्यात आपण गुरफटलेले असतो. आपले

जीवन जत्रेतील ‘मौतका कुआं’ किंवा खालीवर करणारा विजेरी पाळणा (Giant Wheel) प्रमाणे उभ्या आणि आडव्या फेऱ्यात गुंतलेले असते. आयुष्याच्या शेवटी सर्व आजूबाजूलाच असतात पण ‘मी’ नसतो हे ‘वास्तव’ आहे. यालाच

आपण जीवन म्हणतो हे विदारक सत्य मला या गझल मध्ये जाणवले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.