गीतरामायणातील आनंदोत्सव
esakal April 06, 2025 11:45 AM

ऋचा थत्ते

प्रत्येक युगातील, काळातील संपूर्ण राष्ट्राचा, व्यक्तीचाही उद्धार करण्याची असीम ताकद रामकथेत आहे. मराठी मातीचं भाग्य थोर की इथे गीतरामायणाच्या रूपाने रामकथेचं सुरेल शिल्प गदिमा-बाबूजी या दोन शिल्पकारांनी घडवलं. याआधारे रामकथा समजून घेतली तरी रंजनातून अंजन घातलं जाईल.

आजचा राम नवमीचा उत्सव म्हणजे घराघरात आणि मनामनात सुरू असलेला आनंदोत्सव आहे. घरात आणि सार्वजनिक उत्सवातही केलं जातं ते रामरक्षा पठण, रामजन्माचं कीर्तन आणि गीतरामायणाचं गायनही. अगदी याच महिन्यात एक तारखेला गीतरामायण रेडिओवरून प्रसारित झालं, त्याला सत्तर वर्षे पूर्ण झाली.

सत्तर वर्षांपूर्वी रेडिओ हे एकमेव माध्यम. त्याची पूजा करून कानात प्राण आणून श्रोते वाट पाहायचे. प्रसारित झालेलं गीत मनात साठवायचे आणि आकाशवाणीवर पत्रांचा पाऊस पाडायचा. ऐकलेल्या आणि वाचलेल्या या वर्णनानेही भारावून जायला होतं. तो काळ तर अनुभवला नाही, पण गीतरामायणाची गोडी अशी अवीट की त्याचे कार्यक्रम आजही सतत होतात. आणि त्याबद्दल निरूपण करण्यासाठी बोलावणं यावं हेही भाग्याचंच. गीतरामायण म्हणजे गदिमा-बाबूजी या द्वयींनी साकारलेली ५६ गीतांची सुरेल रामकथाच. जेव्हा जेव्हा आनंदोत्सव साजरा होतो तेव्हा आपण अक्षरशः त्या काळात जातो. पहिलंच गीत कुशलव रामायण गाती. ‘पुत्र सांगती चरित पित्याचे’ असा हा प्रसंग म्हणजे ‘पुत्र भेटीचा महोत्सव.’ पण गंमत अशी की ‘उभया नच माहिती.’ पाहा तरी - गीतातील शब्द वेचतच मी लिहित चालले आहे.

रामकथेचं गायन सर्गामागून सर्ग असं सुरू असतं आणि समोर येतो तो रामजन्माचा मंगल सोहळा. चैत्र शुद्ध नवमीला ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ या वेळी कौसल्येची अवस्था कशी? कारण संतानप्राप्तीसाठी किती दिवस ती झुरत होती आणि आता तिची अवस्था ‘ओघळले आसू सुखे कंठ दाटला.’ राजगृहासाठी ही अशी काही सौख्य पर्वणी होती, की अंगणातील गाईंनासुद्धा पान्हा फुटला आणि त्या हंबरू लागल्या. पाहा गदिमा कसे परीघ टप्प्याटप्प्याने वाढवत नेतात. अंगणानंतर बगिचाही बहरल्याचं वर्णन! आणि मग ही आनंदवार्ता नगरीतही पोचताच ‘बुडून जाय नगर सर्व नृत्यगायनी’ आणि इतकंच कशाला, अहो भगवंताचा सातवा अवतार ना हा! त्यामुळे गीतातील शेवटचे दोन शब्द - ‘शेष डोलला.’ ज्याने आपल्या फण्यावर पृथ्वी तोलून धरली तो शेषही आनंदाने डोलू लागला. अंगावर रोमांच येतात. काय ही प्रतिभेची उत्तुंगता.

बालक रूपातील रामचंद्रांच्या लीला म्हणजे कौसल्येसाठी एक एक क्षण आनंद सोहळाच असणार आणि जणू तिच्या दृष्टीतून आपणही तो अनुभवतो. ‘सावळा गं रामचंद्र’ याच चरणाने प्रत्येक कडवं सुरू होतं. कौसल्या रामाला न्हाऊ घालते, भरवते, निजवते हे सर्व वर्णन येतं. आणि मग चार भाऊ एकत्र खेळत आहेत याचं वर्णन गदिमा करताना म्हणतात, ‘हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो.’ रामचंद्रांची ती नीलवर्णी कांती आपल्या डोळ्यासमोर तेजाळते. तशीच मनाला स्पर्शून जाणारी अजून एक ओळ - ‘माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण’ ही चार भावंडे म्हणजे जणू एका श्लोकाचे चार चरण! काय विलक्षण कल्पना.

सीता स्वयंवर म्हणजेच गदिमांच्या शब्दात ‘सभामंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे.’ इथे एकाही शब्दाला पर्याय सुचणारच नाही. शिवधनुष्य पेलून रामचंद्रांनी दोन तुकडे केले त्या वेळी झालेला भयंकर नादाचेही गदिमा वर्णन करतात, पण त्याने जराही रसभंग होणार नाही अशी विलक्षण शब्दयोजना - ‘ताडिताघातापरी भयंकर नाद तोच होई.’ आणि मग मनासारखे सगळे होत असल्याने जानकी लाजत आहे हे पाहून ‘तृप्त जाहले संचित लोचन क्षणात जनकाचे’ ही वधूपित्याची अवस्था झाली. सीता वरमाला घालण्याकरिता रामाच्या दिशेने चालत जाते या कृतीचे वर्णन गदिमांनी कसे करावे ‘गौरवर्ण ते चरण गाठती मंदिर सौख्याचे.’ सीतेचे सौंदर्य आणि तिची भावावस्था दोन्ही एकाच ओळीत एकवटली पाहा. तर ‘आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे.’

त्यानंतर रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या कल्पनेनंच ‘आनंद सांगू किती’ या गीतातून आनंदाला उधाण आलं असलं तरी रामचंद्रांच्या वाट्याला राज्यत्याग अन् काननयात्रा हे भोग येतात. अर्थात त्यामुळे रामचंद्र जराही विचलित न होता ‘सर्व कर्मजात’ म्हणत सहज स्वीकार करतात. ‘रावणवध’ हेच या अवताराचे कारण असल्याने पुढील घटनांची मालिका रावणवधापर्यंत घेऊन जाते.

रावणवध म्हणजे अधर्माचा शेवट, दुर्जनाचा संहार, संतसज्जनांचे रक्षण आणि धर्माचा विजय! त्यामुळे ‘दाही दिशांची मुखे उजळली कंपित ती अवनी झाली, जयश्री लाभे सत्याला,’ असं संपूर्ण जगतातील आनंद सोहळ्याचे वर्णन करीत ‘देवहो, बघा रामलीला’ म्हटले आहे. खरोखर दुर्जनांचा नाश झाल्यावर सुटकेचा नि:श्वास काय असतो याची जाणीव हे गीत करून देतं.

केवळ वनवास संपवून नाही तर रावणवध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला परततात. तेव्हा अयोध्येला आनंदाचा महापूर येतो. रामचंद्रांच्या येण्याने पृथ्वी आणि वायूही पुलकित होतात आणि

‘आज अहिल्येपरी जाहला नगरीचा उद्धार’ अशा तंतोतंत भावना गदिमांच्या लेखणीतून प्रकट झाल्या आहेत.

(लेखिका निवेदिका, व्याख्यात्या आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.