वैशिष्ट्यपूर्ण उच्चारांची मजा
esakal April 06, 2025 11:45 AM

अशोक नेने

चित्पावनी बोली समजायला आणि शिकायला सोपी आहे. तिचा गोडवा तिच्या उच्चारणात आहे. या बोलण्याची ढब, शैली निराळी आहे. त्यात एक हेल आहे. ही बोली अनुनासिक असल्यामुळे अनुस्वारांना खूप महत्व आहे. क्यें, कितां, केलां-जालां, थेयलां, घेतलां, नांय, माजां, तुजां, सांगसां, विचारसां, म्हटलां, तेंचो-हेंचो, इ. अनुस्वारांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच स्वरांना आहे. ‘ओ’च्या जागी ‘ऑ’ असा पसरट उच्चार केला जातो. उदा. गेला-गेलो-गेलॉ, राहिला-ऱ्हेलो-ऱ्हेलॉ, आला-आयलो-आयलॉ, होता-सलो-सलॉ, मेला-मेलो-मेलॉ, झालं-जालो-जालॉ. तसंच मराठीतले ‘आकारांत’ शब्दही चित्पावनीत ‘ओ’ वा ‘ऑ’ने संपतात. चमचा-चमचो-चमचॉ, माझा-माजो-माजॉ, आमचा-आमचो-आमचॉ, त्याचा-तेचो-तेचॉ. ‘ओ’ ने संपणाऱ्या शब्दाचे सुरुवातीचे अक्षर मात्र पसरट होत नाही. उदा. बोड्यो (‘बो’ पसरट होत नाही, ‘ड्यो’ पसरट होतो.) घोडो (‘घो’ नाही, पण ‘डो’ पसरट होऊन ‘ड्यॉ’ असा उच्चार होतो.)

काही शब्द सरळ लिहिले तरी ते जोडाक्षरी उच्चार करतात. इकडे-तिकडे- हेगडा-तेगडा- हेग्डा-तेग्डा, जाणते-जाणटे-जांण्टे, मुलगे-भुरगे-भुर्गे, दिसते-दिससे-दिस्से, कुजका-कुस्को, अख्खा-अस्को. पण शब्दबदल होताना सर्व शब्दांना एकच नियम लागू होत नाही. म्हणून या बोलीचं व्याकरण तयार करणं कठीण आहे आणि ते अजून तयार झालेलं नाही. ही बोली हल्ली लिखित स्वरूपात आली आहे, तिला मराठीप्रमाणेच नियम लागू होतात. मात्र यापुढे चित्पावनीचा व्याकरणिक अभ्यास व्हायला हवा. काही ठिकाणी येणे, जाणे, बोलणे, घेणे, देणे, करणे, या क्रियापदांचे बदल येवप, जावप, बोलप, घेवप, देवप, करप, असे होतात, तर काही ठिकाणी येणां, जाणां, बोलणां, घेणां, देणां, करणां, असे बदल केले जातात. पिशवीतून, खिश्यातून, कपाटातून या मराठी शब्दांचा बदल पिशव्यात्थींन, खिसेत्थींन, आरमारीत्थींन, असा होतो.

आतून, बाहेरून, वरून, खालून हे शब्द भितरथींन, भायेरथींन, वर्थीन, खालथींन, असे होतात. माझ्याकडे-माथांन, तुझ्याकडे-तुथांन, त्याच्याकडे-तेथांन, ह्याच्याकडे-हेथांन, तिच्याकडे-त्याथांन, इथे प्रत्यय बदलतो. पण माझ्याकडे-माजेकडा, त्याच्याकडे-तेचेकडा, तुझ्याकडे-तुजेकडा, इथे प्रत्यय तसाच रहातो. माझ्याजवळ-माजेगोटा, तुझ्याजवळ-तुजेगोटा, तिच्याजवळ-त्याचेगोटा असे शब्दही वापरतात. पण त्याचा अर्थ निराळा- कवेत/मिठीत असाही असल्याने नवशिक्यांचा गोंधळ उडू शकतो. गोंधळात टाकणारे अजून काही शब्द आहेत. त्याला-तेला, तिला-त्याला, ह्याला-हेला, हिला- ह्याला, ज्याला- जेला, जिला- ज्याला. काही शब्दांना वेगळे प्रत्यय लागतात. असूदे-सोंदे, राहूदे-ऱ्हेंवदे, जाऊदे-जांवदे, येवूदे-येंवंदे. म्हणून व्याकरणिक अभ्यास होणं गरजेचं आहे. असं झाल्यास नवशिक्यांना ही बोली शिकणं सोपं होईल.

काही शब्दांचा अर्थ वाक्याप्रमाणे बदलतो. ‘मार’ हा मराठी शब्द चित्पावनीत आहे, पण तो वेगळ्या अर्थानं वापरला जातो. ‘मार’ म्हणजे ‘मार’ असा अर्थ असला तरी, ‘कर’ असाही आहे. गजाली/चकाटां मार मरे, भिंत रंगव असं सांगताना रंग मार मरे, चहा मार मरे, ‘चोप देणे’साठी मार घाल मरे! आता ‘मरे’ हा शब्द एकवचनी आहे, पण लहानापासून थोरांपर्यंत तो वापरतात. ये मरे, चल मरे वगैरे.

चित्पावनीतील काही संवादात्मक वाक्ये तर अगदी मजेशीर वाटतात. ‘मेलो रे हो सांगतेलो’ (हा आणखी काय सांगणार!) ‘हेला सांगेचे पेक्षा गाढवाला सांगलेलां बरां रे बाबा’ (याला सांगून निरर्थकच!), ‘एरवी चोबाळी कशी सांगसे गजाली’ (वायफळ बोलणारी), ‘हय रे! कें रे गेलोस, मेलोस कारे, कें हुळवादलो काय?’ (अरे गेलास कुठे? बेपत्ता झालास?), ‘ये रे तू मात्सो मरत नाय’ (ये रे तू जरा, काही मरायला होत नाही), ‘चल रे चल तू, तुला कोण खात नाय’ (चल तू. तुला कोण खात नाही), ‘तो धड न्हूय रे बाबा. माजी करील खांटोळी’ (त्याचं काही खरं नाही, मारून टाकील मला), ‘ये मरे, तुला कितां पटकी आयली से?’, ‘में नायरे’, ‘माजेन नजे रे’, ‘सवंग केंचा... हेडा म्हटले तेडा जासे,’ हे तुच्छतेनं बोलल्यासारखं वाटतं, पण त्यात तेवढाच आपलेपणा असतो!

काही गंमतशीर शब्द आहेत. बागुडडो म्हणजे झुरळ, सरडा म्हणजे शेड्डो. हात धुणे म्हणजे आंवप, कपडे धुणे म्हणजे होळप, ‘धुणे’साठी वेगवेगळ्या शब्दांचा वापर होतो. पाट म्हटलं की पाण्याचा पाट/ कालवा असाच अर्थ होतो. कोंकणीमध्ये मात्र तो बसायचा पाट असतो- तो चित्पावनीमध्ये होतो ‘पिढां’. ‘मध्ये’ ऐवजी ‘मध्यां’ म्हणतात. ‘कामाशिवाय फिरणे’साठी ‘फोलगा मारप’, ‘भीती दाखवणे’- ‘दरडावप’, ‘भय दाखवून ओरडणे’- ‘खेचकप’, ‘बेपत्ता होणे’- ‘हुळवादप’ असे शब्द येतात.

आजच्या पिढीला न उमगणारे काही पोर्तुगीज शब्द चित्पावनीत वापरले जायचे. पाशेरां- कामाशिवाय येराझाऱ्या, पाश्येस- सहनशीलता, भुशकोट- शर्ट, बुत्यांव- बटण, जनेल- खिडकी, चेपां- विलायती कॅप, कुयदाद- काळजी घेणे, वालोर- किंमत/ शाबासकी.

चित्पावनीतील म्हणी व उखाण्यांतही गंमत आहे. ‘रिकामा विंन्हा कुले ताशी’ (‘रिकामा विंन्हा’ म्हणजे रिकामटेकडा माणूस. ‘कुले ताशी’चं भाषांतर करण्याची आवश्यकता नाही!) ‘नाचता येत नाय आंगण वाकडां... रांदता येत नाय ओली लाकडां’, ‘पगोळ्याचां पाणी पाश्टाला’ (उलटसुलट काम करणे), ‘आपापाचो म्हाल गपापा’. ‘सावर फुलली रानात बाये फुललो एता पळस, ...चा नाव घेवे मला नाय आळस’, ‘कुळागरातल्या झरीला थंडगार पाणी, मन माझा गासे गे गोड गोड गाणी’, ‘माहेरा जरी गे ऱ्हेल्यां दूर , ...रावांशी जुळले सत जन्माचे सूर’.

शेकडो वर्षे जुने असलेले शब्द टिकवून असलेली ही बोली आज अस्तित्वात आहे याचं समाधान वाटतं. नवीन पिढीनं पाठ फिरवली असली, तरी खूपशी मंडळी चित्पावनीच्या संवर्धनासाठी, दस्तावेज तयार करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवून ही बोली टिकवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. साद घातलीय... आणखी प्रतिसाद मिळाला तर आनंदच आहे!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.