Shivendra Raje Bhosale : राज्याची आर्थिक परिस्थिती लाडकी बहीण योजनेनंतर (Ladki Bahin Yojana) खूपच अडचणीत आल्याने विकासकामांना कात्री लावावी लागत आहे. यामुळे मंत्र्यांच्याही अडचणी वाढत असून आमदार आणि कार्यकर्त्यांना कसे समजायचे हा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो. याचाच प्रत्यय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनाही आल्याचे दिसून आले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पंढरपूर (Pandharpur) येथील शेलार कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनाला आले असता अनेक रस्त्यांच्या अडचणींबाबत लोकप्रतिनिधींनी त्यांना साकडे घातले. याचे उत्तर त्यांनी आपल्या भाषणात दिले. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्याने यंदा काही करू शकलो नाही. पण, जून नंतर मात्र कामांचा पाऊस पाडतो, असे आश्वासन त्यांनी आमदार समाधान अवताडे (Samadhan Autade) आणि आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांना भाषणातून दिले. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप हा सर्वांनाच मदत करतो. त्यामुळे भाजपची साथ सोडू नका, असे आवाहनही केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (Makarand Patil) आणि सातारा जिल्ह्यातील बहुतांश नेते उपस्थित होते. यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि विठ्ठल दर्शन घेतले.
दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केंद्रीय रस्ते निधीमधून सातारा जिल्ह्याला तब्बल 218 कोटी रुपयांचा भरीव निधी मिळवून दिला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवेंद्रराजेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय रस्ते निधीमधून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याने जिल्हावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे त्वरित सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना शिवेंद्रराजेंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..