बिहारमधील पोस्टर वॉर ओव्हर वकफ बिल
Marathi April 06, 2025 12:24 PM

संजदने केले राजदला लक्ष्य, आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा मुद्दा बनण्याची लक्षणे

वृत्तसंस्था / पाटणा

ऐतिहासिक वक्फ कायदा सुधारणा विधेयक संसदेने शुक्रवारी संमत केल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद बिहारच्या राजकारणावर होतील, असे चिन्ह दिसत आहे. बिहारमध्ये या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत वक्फ हा महत्वाचा मुद्दा असेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या या विषयावर बिहारमध्ये नितीशकुमार यांचा पक्ष संयुक्त जनता दल आणि लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्यात जोरदार पोस्टरयुद्ध होत आहे. सध्या संयुक्त जनता दलाकडून बिहारची राजधानी पाटणा येथील अनेक मार्गांवर लावण्यात आलेले एक पोस्टर साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. लालू प्रसाद यादव यांनी वक्फ विधेयकावर कसा दुतोंडीपणा केला आहे, हे या पोस्टरमध्ये मांडण्यात आले असून त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. रंग बदलणारा खरा सरडा कोण आहे ? असा प्रश्न या पोस्टरमध्ये विचारला आहे.

यादवांचे विधान काय होते ?

2010 मध्ये जेव्हा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष केंद्रातील मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये सहभागी होता, तेव्हा लालू यादव यांनी बिहारमधील वक्फ मंडळावर टीका केली होती. वक्फ मंडळाने बिहारमध्ये मोक्याच्या जागा बळकाविल्या आहेत. अनेक जागा वक्फ मंडळाच्या सदस्यांनीही हडपल्या आहेत, असे त्यावेळी लालू यादव यांचे म्हणणे होते. हे रोखण्यासाठीच केंद्र सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा केली आहे. मात्र, त्यावेळी वक्फ मंडळावर टीका करणारे लालू यादव आज केंद्र सरकारवर टीका करीत आहेत. हा सरळसरळ दांभिकपणा नाही काय ? असा मुद्दा या पोस्टरमधून मांडण्यात आला आहे. देशभरात अनेक जागा वक्फ मंडळांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्या आहेत, असा आरोप पूर्वीपासूनच होत आहे.

प्रथम पित्याचे विधान अभ्यासा

आज लालू यादव यांचे पुत्र आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव केंद्र सरकारवर वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावर तुटून पडले आहेत. पण त्यांनी आधी आपल्याच वडिलांनी 2010 मध्ये देशाच्या लोकसभेत केलेले विधान अभ्यासावे. लालू यादव यांनी त्यावेळी वक्फ मंडळांवर कशी टीका केली होती, ते तेजस्वी यादव यांनी समजून घ्यावे. त्यानंतर त्यांना केंद्र सरकारने आज वक्फ कायद्यात केलेल्या सुधारणांचे महत्व पटल्याशिवाय राहणार नाही. तेजस्वी यादव यांचा नव्या वक्फ विधेयकाला असणारा विरोध केवळ एक नौटंकी आहे. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ते अशी भूमिका घेत आहेत, असे प्रतिपादन संजदने केले.

हे विधेयक गरीबांसाठीच

नव्या वक्फ विधेयकामुळे देशातील गरीब मुस्लीमांचा लाभ होणार आहे. आजवर त्यांची ढाल पुढे करुन धनदांडग्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी वक्फ मालमत्तांशी जो खेळ केला आहे. तो आता उघडा पडत आहे. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. नव्या वक्फ विधेयकाला आपला असलेला विरोध पोकळ आणि प्रभावशून्य आहे, हे त्यांना मनातून पटले आहे. पण उसने आवसान आणून त्यांनी हे नाटक चालविले आहे. ते लवकरच त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या बिहारमधील नेत्यांनी केली असून संजदच्या पोस्टरला त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यादव यांच्याकडून या पोस्टरवर अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण हे युद्ध थांबण्याची शक्यता नाही, असे दिसते.

लालू यादवांना हवे तेच केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ कायद्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत, त्या लालू यादव यांनाही हव्याच होत्या. पण आता त्यांनी आपला रंग बदलला असून खरा सरडा कोण आहे हे स्पष्टपणे दाखविले आहे. लालू यादव त्यांच्या मागच्या विधानापासून मागे हटू शकत नाहीत. त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी प्रथम लालू प्रसाद यादव यांचे ते विधान चुकीचे होते, हे मान्य करावे. तरच त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे, असे संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांनी त्यांच्या संबंधित वक्तव्यांमध्ये प्रतिपादन केले आहे.

बिहारमध्ये तीव्र पडसाद

ड नव्या वक्फ सुधारणा विधेयकावर बिहारमध्ये मोठा राजकीय संघर्ष

ड बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक, वक्फ मुद्दा गाजणार

ड गरीब मुस्लीमांच्या कल्याणासाठीच वक्फ कायद्यात केंद्राची सुधारणा

ड वक्फच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, पैशाचा गैरव्यवहार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.