Ram Navami 2025 : नांदेड शहरातील चिखलवाडीत रामनवमी उत्सवाची ४७ वर्षांची परंपरा
esakal April 06, 2025 01:45 PM

नांदेड : शहरातील चिखलवाडी भागातील श्री सीताराम मंदिरात यंदा रामनवमी उत्सवाचे ४७ वे वर्ष साजरे केले जात आहे. श्रद्धा,भक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिवर्षी प्रमाणे हा सोहळा साजरा करण्यात येत आहे.

गोदावरीबाई उंबरकर चॅरिटेबल ट्रस्टच्या श्री सीताराम मंदिराची स्थापना वर्ष १९७९ मध्ये करण्यात आली. त्या नंतर २००६ ला या मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आली. मंदिरात सव्वादोन फूट उंचीची प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे. मंदिर परिसरात ध्यान मंदिर असून, येथे रामदास स्वामींची मूर्ती आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून हे मंदिर परिसरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र राहिले. श्रीराम नवमीनिमित्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. काकड आरती, सामूहिक अभिषेक, तेरा अक्षरी श्रीराम नाम जप, सकाळी सात ते रात्री नऊ अध्यात्म रामायण पठण आणि दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव, महाआरती करण्यात येणार आहे.

तसेच रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. सात) दशमीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात शहरातील अनेक मान्यवर, भक्तगण व महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

श्री सीताराम मंदिरात पाडवा ते रामनवमीपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येतो. यात पहाटे सहा वाजता काकडा आरती, तेरा अक्षरी श्रीराम नाम जप, सामूहिक रामरक्षा पठण, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त मंदिर समितीच्या वतीने शहरातील भाविकांनी सहभागी व्हावे.

— रंगनाथ उंबरकर,

विश्वस्त, श्रीमती गोदावरीबाई उंबरकर चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.