‘ब्राह्मण सभे’चा १३ला स्नेहमेळावा
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान ; गाण्याचा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचा वसंतोत्सव स्नेहमेळावा व चैत्रगौरी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १३ रोजी सायंकाळी ४ वाजता साळवी स्टॉप- नाचणे लिंक रोडवरील यशवंत हरी गोखले भवनात हा कार्यक्रम होणार आहे. कला, क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे.
कुवारबांव येथील कार्यक्रमाला लायन्स क्लबचे ओंकार फडके व भाजपचे युवा नेते अनिकेत पटवर्धन उपस्थित राहणार आहेत.
विविध शाळाबाह्य कला, क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष यश संपादन करणाऱ्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील मुलांचे कौतुक करण्यात येणार आहे. तसेच वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या दांम्पत्यांचा तसेच ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या संस्था सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर हळदीकुंकू समारंभ होईल. त्यानंतर प्रमुख आकर्षण म्हणजे सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक अभिषेक काळे व मुग्धा गांवकर यांचा ‘अभंग नाट्यरंग’ हा गाण्याचा त्याच ठिकाणी रंगणार आहे. कुवारबाव पंचक्रोशीतील बंधू-भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनंत आगाशे यांनी केले आहे. संस्थेच्या नव्या वास्तूत वाचनालय, अभ्यासिका, अभ्यागत निवास, विविध प्रकारच्या शैक्षणिक वर्गासाठी खोल्या, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग असी सोय केली जाईल, असे अध्यक्ष अनंत आगाशे यांनी दिली.
----
रेडकर, भडकमकर यांचा सन्मान
गेल्या वर्षीपासून पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या कार्यक्रमात केला जातो. यावर्षी मतिमंदांचा निवासी स्वरोजगार प्रकल्प आशादीप संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी अपंग, अनाथ, दिव्यांग व्यक्तींचे कार्य हाती घेतले आहे. नाचणे येथील नवलाई ग्रुपचे सावंत बंधू जितेंद्र, धर्मेंद्र आणि राजेंद्र सावंत यांनी उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. आरएमसी प्लॅट फक्त रत्नागिरीपुरते मर्यादित न राहता ते आता महाराष्ट्रात, देशात अग्रेसर होत आहेत. कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यरत लिलाधर आत्माराम भडकमकर यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.